नाशिक : गुरुवारी शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर ६७ कॅमेरे आणि सहा ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५६ निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक आणि दोन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत असतील. याशिवाय १५ अधिकारी, १० प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी, आणि १०५० गृहरक्षक दलाचे जवान असे सर्व मिळून जवळपास साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन न्यायालयीन आदेश, शासकीय नियमावलीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, असे आधीच सूचित केले आहे. विसर्जन मिरवणूक कुठल्याही चौकात रेंगाळू नये म्हणून मुख्य चौकात ढोल पथकांना २० मिनिटे वादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेंगाळणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा यंत्रणेने दिला आहे. मुख्य मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, आजवरचा अनुभव पाहता मंडळांकडून त्यास विलंब केला जातो. मिरवणुकीत गुलाल, आवाजाच्या भिंती यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. ढोल पथकांमध्ये मर्यादित वादक असतील याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये कांदा कोंडी कायम; आजपासून एका उपबाजारात लिलाव
हेही वाचा : प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावाने इच्छुकांमध्ये धाकधूक
वाकडी बारव ते पंचवटीतील रामकुंड परिसर या मिरवणूक मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी एकूण ६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. याशिवाय सहा ड्रोनद्वारे लक्ष दिले जाणार आहे. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, ५६ निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक आणि २५ नियमित व प्रशिक्षणार्थी असे २१० हून अधिक अधिकारी कार्यरत असतील. दोन हजार महिला व पुरूष कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. जोडीला गृहरक्षक दलाचे १०५० जवान राहतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.