नाशिक: शहरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रदुषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहरात या वाहनांच्या चार्जिंगसाठी सोयी सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. त्या अंतर्गत नव्याने नऊ चार्जिंग केंद्र उभारण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. पहिल्या टप्प्यात महापालिकेने २० चार्जिंग केंद्र उभारण्याचे निश्चित केले होते. गंगापूर रोड आणि संभाजी स्टेडिअम या ठिकाणी त्यांचे कामही प्रगतीपथावर असून ऑगस्ट अखेरपर्यंत ते कार्यान्वित होण्याचा अंदाज आहे. चार्जिंग केंद्रांचा हळूहळू विस्तार केला जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत आणखी नऊ चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. या कामासाठी मार्च २०२३ मध्ये १० कोटी रुपये खर्चास मान्यता दिली गेली आहे. आता नवीन प्रस्तावित नऊ ठिकाणी ही केंद्रे उभारण्यास हिरवा कंदील दाखविला गेला आहे. या कामासाठी दोन कोटी ५७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
हेही वाचा : नाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू
नवीन चार्जिंग केंद्रांची स्थळे
- मनपा आरोग्य केंद्र (कालिकानगर, पंचवटी)
- मनपा क्रीडांगण (शिवनगर, पंचवटी)
- पेलिकन पार्क (नवीन नाशिक)
- कामटवाडा मनपा शाळा (नवीन नाशिक)
- सर्वे क्रमांक २९६, चर्चलगतची मनपाची जागा शुभम पार्क (नवीन नाशिक)
- सोमाणी उद्यानालगत (जुना पे ॲण्ड पार्क ठिकाण), नाशिकरोड
- निसर्ग उपचार केंद्र क्रीडांगणालगत (नाशिकरोड)
- विहितगाव शाळा, वडनेररोड पाण्याच्या टाकीजवळ (नाशिकरोड)
- सदाशिव भोरे नाट्यगृह (हिरावाडी, पंचवटी)