नाशिक: बिबट्याला घाबरुन रोहित्रावर जाऊन बसलेल्या मोराचा तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाच परंतु, शिकार करण्याच्या नादात बिबट्याचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील घागरनाला ओहळ परिसरात घडली. दुसऱ्या घटनेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या महामार्गावर निपचित पडला होता. तो मयत झाल्याचे समजून वाहनधारकांनी जवळ जाऊन छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बिबट्या अकस्मात उठल्याने सर्वांची पाचावर धारण बसली. बिबट्या दुसऱ्या दिशेने पसार झाला. निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिकारीचा पाठलाग करताना बिबट्यासह मोराचा मृत्यू झाल्याची घटना पानसरे वस्तीवरील गट क्रमांक ४९९ मध्ये घडली. पिंपळगाव बसवंतमधील उंबरखेड रस्ता भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. मागील महिन्यात आमदार दिलीप बनकर यांच्या शेतातील गाई आणि वासरुवर बिबट्याने हल्ला केला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या मोराच्या मागे लागला. बिबट्याच्या भीतीने मोर रोहित्रावर जाऊन बसला तर मोराची शिकार करण्यासाठी बिबट्याने थेट रोहित्रावर झेप घेतली. रोहित्राचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागला. त्यामुळे बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला. यात मोराचाही मृत्यू झाला. मृत बिबट्याचे वय नऊ वर्ष असून तो नर आहे. या घटनेची माहिती मिळताच वन्यजीवरक्षक राजेंद्र पवार, स्वप्निल देवरे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी नाना देवरे, विजय टेकनार अजय शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मोर व बिबट्याचे मृतदेह ताब्यात घेऊन चांदवड परिक्षेत्र येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : नाशिक : स्टेशनवाडी रस्त्यावरुन आमदार-रेल्वे अधिकारी यांच्यात वाद

जखमी बिबट्याने उडवली भंबेरी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारात जखमी बिबट्याने छायाचित्रण करणाऱ्या वाहनधारकांची भंबेरी उडवली. एका वाहनाच्या धडकेत हा बिबट्या जखमी होऊन महामार्गालगत निपचित पडला होता. वाहनधारकांना तो मृत झाल्याचे वाटले. अनेकांनी वाहने थांबवून त्याचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. काही उत्साही मंडळी त्याच्या समीप गेली. गर्दीमुळे बिबट्या अकस्मात उठला आणि छायाचित्रण करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. ते सैरावैरा पळू लागले. जखमी बिबट्याही धास्तावून दुसऱ्या दिशेने पळून गेला. या घटनेची माहिती समजल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आसपास जखमी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो मिळून आला नाही, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik a leopard died while hunting a peacock and in another incident the leopard woke up suddenly on road css