नाशिक : गणेशोत्सवात दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला असलेल्या मागणीचा फायदा उठवत शहरातील काही विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येत आहे. गुजरातहून शहरात येत असलेला हलवा आणि खडोला या मिठाईत भेसळ असल्याच्या संशयाने अन्न व औषध प्रशासन विभागाने साठा जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सहकार्याने नाशिक – पेठ रस्त्यावर एका वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली.
हेही वाचा : नाशिक : नदीत बुडाल्याने युवकाचा मृत्यू
गुजरातमधून सणासुदीच्या काळात हलवा आणि खडोला या मिठाईचा साठा वाहनातून नाशिक शहरात विक्रीसाठी आणण्यात येत होता. पथकाने ५० पिशव्यांमधील साठ्याची वाहनातच तपासणी केली. अन्न पदार्थाच्या वाहतुकीचा परवाना संबंधितांकडे आढळून आला नाही. तसेच अन्न पदार्थाची वाहतूक आवश्यक तापमानात न केल्याने दोन्ही अन्न पदार्थाचे नमुने अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी विश्लेषणासाठी घेतले. तसेच सुमारे दोन लाख ३९ हजार ६०० रुपयांचा एक हजार १९८ किलो हलवा आणि ६२ हजार ५८० रुपयांचा खडोला असा एकूण तीन लाख दोन हजार १८० रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.