नाशिक : येथील नर्तनरंग कथक नृत्य अकादमीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता तालानुभूती या वार्षिक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून कथक नृत्यातील प्रचलित काही तालांचे समग्र दर्शन होणार आहे. अकादमीच्या संचालिका प्रेषिता पंडित आणि त्यांच्या शिष्या हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाकवी कालिदास कला मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. अकादमीच्या वार्षिक नृत्य महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरू विद्याहरी देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रीय नृत्यांगना व अभिनेत्री अश्विनी कासार आणि श्रीसिध्दीविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेचे संस्थापक गणेश सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात तबल्यावर कल्याण पांडे, सितारवर प्रतीक पंडित, गायन व संवादिनी पुष्कराज भागवत हे संगत कलाकार आहेत, तसेच, ध्वनी संयोजक सचिन तिडके, प्रकाशयोजनाकार आदित्य राहणे, छायाचित्र महारूद्र अष्टुरकर व तुषार गाडेकर यांचे तंत्र सहाय्य लाभले आहे.
हेही वाचा : बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांना गावी परतण्यासाठी मोफत बससेवा, नाशिकहून साडेतीन हजार मोर्चेकरी रवाना
कलेच्या प्रांगणात नाशिकला मानाचे स्थान मिळवून देण्यात नाशिकच्या अनेक संस्थांचे योगदान आहे. नर्तनरंग कथक नृत्य अकादमी ही त्यातील एक संस्था. नाशिकमधील प्रसिद्ध ज्येष्ठ गुरू विद्याहरी देशपांडे यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्या घडवल्या आहेत, घडत आहेत. प्रेषिता पंडित, या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या. २५ वर्षांहून अधिक काळ त्या विद्याहरी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या सोबत देश-विदेशात अनेक नामांकित महोत्सवामध्ये प्रेषिता यांनी नृत्य प्रस्तुती केली आहे. दीड दशकापासून त्या स्वतः नाशिकमध्ये नृत्य अध्यापनाचे कार्य करत आहेत. मागील वर्षी त्यांचे वडील ज्येष्ठ कवी किशोर पाठक आणि आई प्रतिभा पाठक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निरूपण कला केंद्राची सुरुवात देखील त्यांनी केली. नर्तनरंग आणि निरुपण या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यशाळा, कार्यक्रम, स्पर्धा, शिबिरे यांचे आयोजन केले जाते. नर्तनरंग अकादमी दरवर्षी आपला वार्षिक नृत्य महोत्सव आयोजित करीत असते. ज्यातून अकादमीच्या सगळ्या शिष्या आपली नृत्य सेवा रुजू करीत असतात. यंदा तालानुभूती या नावाने हा महोत्सव होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.