नाशिक: बऱ्याचदा परीक्षा देतांना सामान्य विद्यार्थ्यांना वेळ कमी पडतो. लिखाणाचा वेग आणि मिळालेला वेळ यांची सांगड जमत नसल्याने याचा परिणाम गुणांवर होतो. सामान्य विद्यार्थ्यांची ही गत असताना अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत संपूर्णपणे लेखनिकावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या वतीने लेखनिकाशिवाय स्वलेखन ॲपच्या सहाय्याने उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी राज्यस्तरावर कार्यशाळा घेण्यात येत असून राज्यात आतापर्यंत ५० विद्यार्थ्यांनी स्वलेखनचा वापर करून परीक्षा दिल्या आहेत.

राज्यात अंध विद्यार्थ्यांसाठी ५० हून अधिक विद्यालये आहेत. यामध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. हे विद्यार्थी पाचवीपर्यंत विशेष शाळेत शिकल्यानंतर पुढे सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे शिक्षण सुरू होते. त्यासाठी त्यांना ब्रेललिपीचा आधार मिळतो. परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी त्यांना लेखनिकावर अवलंबून राहावे लागते. बऱ्याचदा उत्तरे लिहिताना लेखनिकांची धावपळ उडते. याचा परिणाम गुणांवर होतो. हे लक्षात घेऊन नॅबच्या वतीने पुणे येथील निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरावर स्वलेखन कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. निवांत संस्थेने अंध व्यक्तींच्या अडचणी लक्षात घेऊन स्वलेखन हे ॲप तयार केले. याव्दारे संगणक आणि भ्रमणध्वनीच्या माध्यमातून अंध व्यक्ती लिखाण करू शकतो. याविषयी निवांत संस्थेच्या उमा बडवे यांनी माहिती दिली. राज्यात आतापर्यंत १६०० अंध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून यातील ५० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षा दिल्या आहेत. विद्यार्थी या ॲपच्या माध्यमातून ऐकून त्यानुसार टंकलेखन करतात.

हेही वाचा : बस उलटून आठ प्रवासी जखमी

नॅबच्या चारही शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्वलेखनासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. शासनाकडे केजी टु पीजीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात यावे, ही मागणी करत आहोत. शिक्षण मंडळाने अंध विद्यार्थ्यांना संगणकावर परीक्षा देण्यास मान्यता दिली आहे. सध्या साेलापूर, अहमदनगर, नाशिक, सांगली, पुणे येथील शिक्षकांना याविषयी प्रशिक्षण दिले आहे.

मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (पदाधिकारी, नॅब)

हेही वाचा : नाशिक : एटीएम तोडून लाखो रुपयांची लूट

स्वलेखन ॲप भ्रमणध्वनी, संगणकावर मोफत

स्वलेखनचा वापर करतांना हेडफोन आवश्यक आहे. जेणेकरून मजकूर संगणकाकडून वाचला जाईल. त्यानुसार अंध व्यक्ती त्या प्रश्नाचे उत्तर किंवा प्रतिसाद देऊ शकते.