लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: आगामी सार्वजनिक गणेशोत्सवात महानगरपालिकेच्या जागेवर मंडप, व्यासपीठ आणि कमानीसाठी ७५० रुपयांचे शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गणेशोत्सवात वाणिज्य जाहिराती प्रसिध्द केल्यास मंडळांना जाहिरातीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क आणि जाहिरात कर भरावा लागणार आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत आरास, मंडप, व्यासपीठच्या परवानगीसाठी लागणारे शुल्क माफ करण्याची मागणी गणेश मंडळांनी केली होती. त्या अनुषंगाने हा विषय पटलावर ठेवण्यात आला होता.
हेही वाचा… पेठ रस्ता काँक्रिटीकरणास अखेर मान्यता; मनपा ४५ कोटी खर्च करणार
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप, व्यासपीठ व कमानीच्या परवानग्यांसाठी आता ७५० रुपये शुल्क द्यावे लागणार नाही. परंतु, संबंधित मंडळांनी वाणिज्य जाहिराती प्रसिध्द केल्यास जाहिरातीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क व जाहिरात कर द्यावा लागणार असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी म्हटले आहे. हा आदेश गणेशोत्सव २०२३ करीता लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करा- पोलिसांची सूचना
गणेशोत्सवात मंडळांनी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला-पुरुषांच्या वेगळ्या दर्शन रांगा, फलक लावताना पवानगी, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सिडकोतील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महेश भुवन मंगल कार्यालयात मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मंडळांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यात आले. मंडळांनी पोलीस, मनपा, विद्युत विभाग व इतर संबंधित विभागांच्या कायदेशीर परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि पसरवू नयेत, अशी सूचना उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली. बैठकीस आमदार सीमा हिरे यांच्यासह शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.