नाशिक : सुरगाणा तालुक्यातील जांभुळपाडा (दा) पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. महिलांना जंगलातील झिऱ्यावर पाण्यासाठी जावे लागत आहे. गावात टँकरव्दारे पाणी देण्याच्या मागणीसाठी परिसरातील महिलांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करुन हंडे वाजवले. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये पावसाळ्यात मुबलक पाणी आणि पावसाळा संपल्यानंतर टंचाई, असे चित्र दरवर्षीचे आहे. या तालुक्यांमध्ये पुरेशा प्रमाणात धरण, तलाव, बंधारे नसल्याने दरवर्षी आदिवासी बांधवांना टंचाईला सामोरे जावे लागते. या टंचाईवर कायमस्वरुपी उपाय करण्याऐवजी तात्पुरते उपाय केले जातात. त्यामुळे टंचाईची समस्या कायमच राहते.
हेही वाचा : चोपड्यातील गूळ प्रकल्पग्रस्त आक्रमक, जळगाव तापी पाटबंधारे कार्यालयात झोपा काढो आंदोलन
उन्हाळ्यात तर टंचाईचे स्वरुप अधिकच गंभीर होते. केवळ पाणी मिळविण्यातच ग्रामस्थांचा संपूर्ण दिवस वाया जातो. गावाजवळ पाणी मिळत नसल्यास दूर जंगलातून पाणी आणावे लागते. कायम टंचाईला तोंड देणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांपैकी जांभुळपाडा एक आहे. जांभुळपाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी जंगलात पायपीट करावी लागत आहे. सोमवारी सकाळी काही महिला पाणी भरण्यासाठी जंगलात गेल्या असता त्यांना अचानक बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच महिला हंडे टाकून गावाकडे पळाल्या. आरडाओरड झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ जमा झाले, सर्वांनी एकत्र येत रस्ता अडविण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात हंडे ठेवून महिलांनी रास्ता रोको केला. मंगळवारी मनखेडचा आठवडे बाजार असल्याने बाजारासाठी आलेल्या सर्व गाड्या त्यांनी दोन ते तीन तास अडवून धरल्या. सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क झाल्यावर त्यांनी तत्काळ टँकरव्दारे पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात उपसरपंच जयवंती वार्डे, सावळीराम पवार, भीमराज गंगोडे, ज्ञानेश्वर वार्डे, गंगा धूम, पुंडलिक पवार आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा : “…तरच नाशिकचे पाणी जायकवाडीसाठी सोडा”, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सहा महिन्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने विंधनविहीर चालत नाही. त्यासंदर्भात उपसरपंच जयवंती वार्डे यांनी सहा महिने वारंवार पाठपुरावा करून तसेच सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार सांगूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांना गावाची व्यथा सांगितल्यावर त्यांनी तत्काळ उपाय करून तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांना बोलावून घेतले. पाणी समस्या कायमची दूर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जांभूळपाडा ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येत असल्याची खंत व्यक्त केली.