नाशिक : प्रचलित पद्धतीने हमाली, तोलाई आणि वाराई कपात करावी आणि लिलाव सुरू करण्याची प्रशासनाची सूचना अमान्य करुन आचारसंहिता काळात हमाली, तोलाई कपात करायची नाही, ही स्वत:ची भूमिका कायम ठेवत व्यापारी लिलावात सहभागी होऊ लागल्याने जवळपास २१ दिवसांनी बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होत आहेत. नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिलाव पूर्ववत करण्यासाठी व्यापारी संघटनेच्या दबावासमोर बाजार समिती आणि प्रशासनाला आपल्या सूचनेवरून माघार घ्यावी लागल्याचे दिसत आहे. या निर्णयास माथाडी कामगारांकडून विरोधाची चिन्हे आहेत. बाजार समितीत कृषि मालाच्या खरेदी-विक्रीवेळी आकारल्या जाणाऱ्या हमाली, तोलाई, वाराई वसुलीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. थकीत लेव्हीच्या वसुलीसाठी माथाडी कामगार मंडळाने १४०० व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्या. या विरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात अपिल करीत स्थगिती मिळवली. नंतर व्यापाऱ्यांनी हमाली, तोलाई कपात करायची नाही, त्यामुळे लेव्हीचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे निश्चित केले होते. यामुळे माथाडी-मापारी दैनंदिन कामकाजातून बाजूला झाले. लेव्हीच्या वादावरून चार एप्रिलपासून जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद झाले होते. तत्पूर्वी नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी तीन दिवस बाजार बंद होते. या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रचलित पध्दतीने हमाली, तोलाई आणि वाराई कपात करावी आणि लिलाव सुरू करण्याची सूचना केली होती. परंतु, व्यापाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. त्यांनी स्वत:ची भूमिका बाजार समिती व प्रशासनाला मान्य करायला लावल्याचे दिसत आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

हेही वाचा : उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधण्यासाठी काँग्रेसची घाई, पण भाजपची बाजी

प्रशासनाच्या प्रयत्नामुळे नव्या व्यापाऱ्यांना घेऊन अलीकडे पाच बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले होते. १० समित्यांमधील लिलाव बंद होते. सहकार विभागाने स्थानिक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून थेट उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचे सूचित केले होते. आचारसंहितेत उद्भवलेल्या या प्रश्नावर शासन स्तरावरून तूर्तास तोडगा निघणे शक्य नव्हते. त्यामुळे व्यापारी संघटनांशी चर्चा करून या प्रश्नी तात्पुरता तोडगा काढण्यात आला. हमाली, तोलाई करायची नाही, या अटी-शर्तीवर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागाची तयारी दर्शविली. त्यानुसार सोमवारी मनमाड व नांदगाव वगळता उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. व्यापाऱ्यांनी पहिल्याच दिवशी हा विषय मांडला होता. तो मान्य न केला गेल्याने २० दिवस लिलाव बंद राहिले. शेतकऱ्यांची कोंडी झाली. या प्रश्नी आचारसंहिता संपल्यानंतर आता तोडगा काढला जाणार आहे.

हेही वाचा : नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही

बाजार समित्यांना परवानाधारक माथाडी कामगारांना काम देणे बंधनकारक आहे. संघटनेने माथाडी कामगारांना काम मिळावे म्हणून प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचलित पध्दतीने हमाली, तोलाई आणि वाराई कपात करण्याची सूचना केली असल्याकडे माथाडी कामगार संघटनेचे चिटणीस सुनील यादव यांनी लक्ष वेधले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik auction in market committee resumed after pressure of traders on the administration css
Show comments