नाशिक : शहर परिसरात मकरसंक्रातीला होणारी पतंगबाजी पाहता पशु पक्ष्यांसह दुचाकीस्वार, सायकलस्वारांना नायलाॅन मांज्यामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अंबड पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितास अटक करुन त्याच्याकडून १५० नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. वारंवार अशी कृती करणाऱ्या विक्रेत्यास हद्दपार करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.
हेही वाचा : धुळ्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अंबड पोलिसांना सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या मैदानात एक जण पांढऱ्या रंगाच्या गोणीमधून नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत अरबाज फिरोज शेख (२४, रा. नाईकवाडा) याला पकडून ६० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.