नाशिक: पंचवटीतील श्री कपालेश्वर मंदिरातील शिवलिंगाची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने शिवलिंगाला वज्रलेप, भाविकांसाठी भक्तनिवास, महाप्रसाद, गर्भगृहाचा जिर्णोध्दार, ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती श्री कपालेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थानच्या वतीने अपंग, वृध्दांसाठी तसेच गर्दीच्या नियोजनासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ दूरचित्रवाणी संचाव्दारे मुखदर्शन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. भाविकांच्या पायांना उन्हाचे चटके बसू नयेत, यासाठी मंदिर परिसरात लाल गालिचा टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात मंदिराच्या आतील भागात अस्वच्छता होऊ नये आणि भाविकांना असुविधेला तोंड द्यावी लागू नये म्हणून मंदिर परिसरात जलरोधक जाळी टाकण्यात येणार आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी अद्ययावत अडथळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा : कारण राजकारण : पवारांच्या बळाविना भुजबळ शक्तिहीन?
महिला सुविधा कक्षाची बांधणी करण्यात आली असून भाविकांच्या सुविधेसाठी श्री कपालेश्वराचे थेट दर्शन मोठ्या एलईडी पडद्याव्दारे करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या नगरखान्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून श्री कपालेश्वर देवस्थानास क वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्रावणातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे कलंत्री यांनी सांगितले.