नाशिक: शेतकरी उत्पादक कंपन्या, अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. कांदा खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी मान्य केले असून या पार्श्वभूमीवर, नाशिकसह राज्यातील नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघासाठी ( एनसीसीएफ) कांदा खरेदी करणाऱ्या सर्व केंद्रांवरील संपूर्ण कांदा खरेदी केंद्र सरकारने बंद ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
हेही वाचा : निवडणुकीत महायुतीकडून काही चुका;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
नाफेडचे अध्यक्ष अहिर यांनी जिल्ह्यातील काही नाफेडच्या खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली असता गैरप्रकार त्यांच्या लक्षात आल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने यावर्षी राखीव साठ्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातील प्रत्येकी अडीच लाख टन कांदा अनुक्रमे नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्रातील धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, बीड, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना निविदेव्दारे खरेदीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे . संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड व एनसीसीएफसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे आवश्यक होते. परंतु, संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोदामात भरून ठेवला होता. आता नाफेडचे कांदा खरेदीचे दर वाढल्यानंतर हाच स्वस्तातील कांदा नाफेडसाठी खरेदी केल्याचे दाखविले आहे. शेतकऱ्यांकून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून व्यापारी खळ्यांवरील कांदा खरेदी केला जात होता. ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचे अध्यक्षांना निदर्शनास आले आहे. नाफेडसाठी अधिकृत विकत कांद्यापेक्षा दुप्पट कांदा गोदाममध्ये आढळून आला. पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले. आधार कार्ड शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली गेली. तसेच खरेदी-विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचे अध्यक्ष अहिर यांच्या पाहणीत उघड झाले आहे.
हेही वाचा : नाशिक : प्रेम प्रकरणातील मारहाणीमुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, संशयितास अटक
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच नाफेड व एनसीसीएफच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी तसेच ईमेल करुन संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी, राखीव साठ्याकरिता कांदा खरेदीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळावा यासाठी नाफेड एनसीसीएफने थेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती, याकडे दिघोळे यांनी लक्ष वेधले आहे.