नाशिक : आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीनहक्क, जंगलहक्कासह शेतीमालाला रास्तभाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबारपासून मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी नाशिकच्या वेशीवर धडकला. नाशिकजवळील आडगाव परिसरात महामार्गालगत मोर्चा विसावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत. नंदुरबारपासून मोर्चा निघाल्यावर १० दिवसांनी २५० किलोमीटर अंतर पार करुन नाशिकजवळ आला आहे. मोर्चाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी नागपूर येथे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आले. सोमवारी मंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासन घेऊन मोर्चाला सामोरे जातील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. तोपर्यंत वेळापत्रकानुसार मोर्चा सुरुच राहणार असल्याचे रामा गावित यांनी सांगितले.

हेही वाचा : जळगाव : दूध रस्त्यावर…चाळीसगावात योग्य दरासाठी उत्पादकांचे आंदोलन

नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, सटाणा, मालेगाव, शिरपूर हे तालुके संपूर्ण दुष्काळी जाहीर करुन नुकसान झालेल्या वनहक्कदावेदार आदिवासींसह सर्व शेतकर्यांना एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी, साक्री तालुक्यात दुष्काळाची नुकसान भरपाई शेतकरी, वनहक्क दावेदारांना त्वरीत द्यावी, आदी मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत.

हेही वाचा : धुळे जिल्हा परिषदेत निधी अपहार प्रकरण : वादग्रस्त भास्कर वाघची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकारजमा

“उपमुख्यमंत्र्यांशी नागपूर येथे सकारात्मक चर्चा झाली असली तरी याबाबत लेखी पत्र येत नाही, तोपर्यंत मोर्चा सुरू राहील. रविवारी मोर्चा नाशिकजवळ आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी परीक्षा असल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोर्चा सायंकाळी उशीराने मार्गस्थ होऊ द्या, अशी सूचनावजा विनंती केली. यानुसार मोर्चा नाशिक वेशीजवळ येऊनही सायंकाळपर्यंत तेथेच विसावला आहे.” – रामा गावित (सत्यशोधक शेतकरी सभा)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik birhad morcha delegation had meeting with deputy cm devendra fadnavis css