नाशिक : मतदारसंघात कोणता समाज, घटक नाराज आहे, पाच वर्षात खासदारांनी मतदार संघात वेळ दिला, त्यांच्या कामांविषयी समाधानी आहात का, उमेदवारीबाबत काय वाटते, त्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नव्या व्यक्तीला मैदानात उतरवायचे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे भाजपचे निरीक्षक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय केणीकर यांनी दिंडोरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकपणे साधलेल्या संवादात मिळवली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या कामाविषयी काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दिंडोरी लोकसभा मतदार संघासंदर्भात बैठक पार पडली. या मतदारसंघाच्या निरीक्षकांनी तालुकाप्रमुख ते जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड वैयक्तिकरित्या संवाद साधून मते जाणून घेतली. या ठिकाणी इतरांना प्रवेश नव्हता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार या देखील पूर्णवेळ बाहेर बसून होत्या. निरीक्षकांनी खासदारांचा मतदार संघात दौरा कधी असतो. किती वेळ देतात, कार्यकाळात किती कामे केली, कोणती कामे राहिली, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का, केलेली कामे मतदारापर्यंत पोहोचली का, हे जाणून घेतले. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मध्यंतरी संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपकडून त्या अनुषंगाने चाचपणी करण्यात आल्याचे समजते. मतदारसंघात कोणता समाज वा घटक नाराज आहे का, याची विचारणाही निरीक्षकांनी केली. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा हा भाग आहे. निर्यात बंदी लागू करण्यापासून ते ती काहीअंशी शिथील होऊनही शेतकरी वर्गात नाराजी आहे. याबद्दल कुणी काय माहिती दिली, याची स्पष्टता झालेली नाही.

हेही वाचा : निम्म्याहून अधिक नाशिकमध्ये शनिवारी पाणी बंद

मागील लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. आगामी निवडणुकीत पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याविषयी काय वाटते, याबद्दल प्रत्येकाकडे विचारणा करण्यात आली. यावेळी काहींनी पक्ष संघटनेला त्यांची फारशी मदत झाली नाही, पदाधिकाऱ्यांना लवकर भेट मिळत नाही, असा नाराजीचा सूर लावत जागा राखण्यासाठी उमेदवार बदलण्याचा आग्रह धरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डॉ. पवार यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे विभाग व पक्षाच्या कामासाठी त्या देश पातळीवर कार्यरत राहिल्याकडे काहींनी लक्ष वेधले. किमान आता उर्वरित काळात त्यांनी मतदारसंघात लक्ष द्यावे. मेळावे, गाठीभेटी घेऊन सक्रिय होण्याची गरज संबंधितांनी मांडली. हा अहवाल निरीक्षकांमार्फत पक्षाकडे सादर केला जाईल. यावर दिंडोरीत भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, हे निश्चित होणार असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.

हेही वाचा : समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…

प्रश्नांची मालिका

निरीक्षकांनी दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात खासदारांचा मतदार संघात दौरा कधी असतो. किती वेळ देतात, कार्यकाळात किती कामे केली, कोणती कामे राहिली, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का, केलेली कामे मतदारापर्यंत पोहोचली का, मतदारसंघात एखादा समाज वा घटक नाराज आहे का, आगामी निवडणुकीत डाॅ. भारती पवार यांना उमेदवारी देण्याविषयी काय वाटते, असे प्रश्न विचारण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik bjp inspection to know of which society is upset in dindori lok sabha constituency css