नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांपैकी ज्यांना तीन ते पाच योजनांचा लाभ मिळाला असेल, अशा घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार सांगायचा, त्यांच्या समवेत छायाचित्र काढायचे, अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या लाभार्थी संपर्क अभियानातून भाजपने विरोधकांच्या आक्षेपांना घरोघरी प्रचारातून उत्तर देण्याची रणनीती आखली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० ते १२ हजार लाभार्थ्यांशी संपर्क साधला जाणार आहे.
राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. त्या अंतर्गत नाशिक लोकसभा क्लस्टरची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी लाभार्थी संपर्क अभियानाचे महत्व अधोरेखीत करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी, हे अभियान प्रभावीपणे पार पाडल्यास महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही, असे सूचित केले. महसूलमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची संघटनात्मक रचना प्रचंड मोठी असून प्रत्येक पातळीवर, प्रत्येक आघाडीवर पक्षाची यंत्रणा प्रभावीपणे कार्यप्रवण असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार
या अभियानासाठी भाजपने तीन ते पाच सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींची प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या त्या, त्या जिल्ह्यात वितरित केल्या आहेत. यात प्रत्येक केंद्रात (बुथ) साधारणत: ५० ते १०० लाभार्थ्यांची घरे आहेत. नाशिक शहरात ९९९ केंद्र आहेत. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेे दररोज काही घरांना भेटी देतील. लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानांचा नमस्कार सांगतील. पुढील पंधरा दिवसात हे अभियान पूर्णत्वास नेले जाणार असल्याचे नाशिकचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले. लाभार्थ्यांसमवेत काढलेले छायाचित्र कार्यकर्ते नमो व सरल ॲपवर टाकतील. केंद्र व राज्याच्या योजनांचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा म्हणून आपण आधीपासून प्रयत्न केले. त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी म्हटले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील तीन आणि ग्रामीणमधील तीन मतदारसंघांचा समावेश होतो. दिंडोरीतील सहाही विधानसभा मतदारसंघ ग्रामीणमधील आहेत. सरकारच्या पीएम किसान, घरकूल, शेडनेट, वैद्यकीय, कृषी, समाजकल्याण. कामगार. लघू-मध्यम उद्योजक आदी योजनांचा अनेकांना व्यक्तिगत लाभ मिळाला. त्या लाभार्थी कुटुंबांची या निमित्ताने भेट घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जाहीर प्रचारास भाजपने घरोघरी प्रचाराची जोड दिली आहे.
हेही वाचा : “नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला
शासन आपल्या दारी वा अन्य उपक्रमातून याआधी महायुतीकडून लाभार्थ्यांशी संवाद साधला गेला होता. लोकसभेच्या प्रचारात विरोधक आरोपांची राळ उडवून नकारात्मक वातावरण तयार करत आहेत. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लाभार्थी संपर्क अभियानातून मोदी सरकारच्या योजना, मिळालेले लाभ थेट मतदारांसमोर मांडण्याचे नियोजन केले आहे. अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप कार्यकर्ते घरोघरी सरकारच्या कामांची उजळणी करणार आहेत.