नाशिक : राज्यात नव्याने आकारास आलेल्या महायुतीत शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदार संघात भाजपकडून पध्दतशीरपणे मोर्चेबांधणी सुरू असल्याचे अधोरेखीत होत आहे. या जागेसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून तयारी करणारे भाजपचे प्रबळ दावेदार दिनकर पाटील यांनी आता पुस्तकाच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्याची तयारी केली आहे.
मनपाचे माजी सभागृह नेते तथा भाजपचे प्रदेश सदस्य दिनकर पाटील यांच्या आजवरच्या कार्याचे प्रतिबिंब मांडणारे व्रत सेवेचं या पुस्तकाचे प्रकाशन पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात झाले. यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लोकसभा समन्वयक गिरीश पालवे आदी उपस्थित होते. या पुस्तकाच्या माध्यमातून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली-नाशिकरोड, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या सर्व मतदार संघात पुस्तकांचे वितरण केले जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : नाशिक : कांदा दरात उसळी; एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ
महायुतीत नाशिक लोकसभेची जागा कुणाकडे जाईल, हे अद्याप निश्चित नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तत्पुर्वी म्हणजे २००९ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ या मतदार संघात विजयी झाले होते. नंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातातून निसटला. महायुतीत आता ही जागा अजितदादा गटाला मिळण्याची सूतराम शक्यता नाही. शिवसेना तडजोड करेल की नाही, याची स्पष्टता नसली तरी या ठिकाणी भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जातो. या स्थितीत समीर भुजबळ यांनी नाशिकच्या राजकारणातून बाजुला होत राष्ट्रवादी (अजित पवार गट) मुंबईचे अध्यक्षपद स्वीकारले.
हेही वाचा : नाशिक: मराठी शाळेची गळचेपी करणाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी; रचना विद्यालयाची जागा बळकावण्याचे प्रकरण
अलीकडेच एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व कार्यक्रम नाशिक लोकसभा मतदारसंघात होते. ही जागा कुणाकडे जाईल, याचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या नेत्यांसह भाजपची संसदीय समिती घेईल, असे त्यांनी म्हटले होते. आगामी विधानसभा, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पक्ष संघटना मजबूत करीत असल्याचा दावा त्यांनी केला होता. पुस्तकाच्या माध्यमातून पाटील यांनी सुरू केलेल्या प्रचाराला पक्षाकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र आहे.