नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून महायुती विरोधात लढलेल्या भाजपच्या बंडखोरांना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा पक्षात सहजासहजी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी तसे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीत महापालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गिते, माजी नगरसेवक दिनकर पाटील, केदा आहेर यांनी पक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी केली होती. यातील गिते आणि पाटील हे विरोधी पक्षात जाऊन निवडणूक लढले तर, आहेर हे अपक्ष मैदानात होते. यापैकी कोणालाही यश मिळाले नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बंडखोर स्वगृही परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना भाजप आमदारांकडून विरोध होत आहे. यासंदर्भात, महाजन यांनी बंडखोरांविषयी एकाकी निर्णय घेतला जाणार नसल्याचे सूचित केले.
हे ही वाचा… नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
हे ही वाचा… निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल. बंडखोर विरुध्द बाजूने लढले. निवडणुकीत आमच्याशी भानगडी, हाणामाऱ्या केल्या. तिकडे लढला आणि कपडे झटकून आला, असे होणार नाही. बंडखोरांना भाजपमध्ये सहजासहजी प्रवेश मिळणार नसल्याचे महाजन यांनी नमूद केले.