नाशिक : पाण्याच्या डबक्यात पडून लहानग्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे हा प्रकार घडला. रामनगर येथे बस थांबा परिसरातील पाण्याच्या डबक्याजवळ आयुष बंडकर (पाच वर्षे), धनश्री बंडकर हे बहीण-भाऊ एका लहान मुलासोबत खेळत होते. खेळतांना पाय घसरून आयुष आणि धनश्री दोघेही डबक्यात पडले.
त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. डबक्याजवळ असलेला लहान मुलगा रडत होता. गावात बसमधून उतरलेल्या प्रवाशाला रडणारा लहान मुलगा दिसला. त्यानंतर प्रवाशाला दोन जण पाण्यात दिसली. प्रवाशाने आरडाओरड केल्यावर इतरजण मदतीस धावले.
हेही वाचा…नाशिक : स्थापत्य अभियंता हेमंत गोडसे यांच्यावर पुन्हा शिवसेनेची भिस्त
ग्रामस्थांनी बहीण-भावास डबक्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत बालकांचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आई घरी काम करत होती.