नाशिक: धुळ्यातील दूध उत्पादक कंपनीच्या उत्पादनास प्रमाणित करण्यासंबंधीचे (ॲगमार्क) प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकरोड येथील पणन व तपासणी संचालनालयातील वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. न्यायालयाने संशयिताची पाच सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात धुळे येथील दुधापासून विविध उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने तक्रार केली होती. त्याआधारे सीबीआयने विशाल तळवडकर आणि ॲग-मार्क नाशिक कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कंपनीने आपल्या उत्पादनास ॲग-मार्क परवान्यासाठी अर्ज केला होता. बराच काळ लोटूनही हे प्रमाणपत्र दिले गेले नव्हते. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात पणन व तपासणी संचालनालयाचे कार्यालय आहे. येथील अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा : नाशिक: खड्ड्यांसह नागरी समस्यांविषयी भाजप आमदारांचा मनपा आयुक्तांना इशारा

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले. स्वत:सह इतरांसाठी त्याने ही लाच मागितल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. संशयिताचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती पथकाने घेतली. तळवडकरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर आले. न्यायालयाने त्याला पाच सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik cbi arrests government officer red handed while taking bribe of rupees one lakh css