नाशिक : ग्रामीण तथा शहरी भागातील रोहित्र बिघाडानंतर कृती व मानकाप्रमाणे वेळेत बदलण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे. विद्युत अपघातामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागतात. ही दुर्दैवाची बाब असून विद्युत अपघात शून्य होण्यासाठी विद्युत निरीक्षक विभागाने शाळा व ग्राहकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश वीज मंडळ कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिले.
विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली. यावेळी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर उपस्थित होते. प्रारंभी, जिल्ह्यातील महावितरणच्या नाशिक आणि मालेगाव मंडलातील महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाय योजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि प्रस्तावित नियोजन या संदर्भात नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी, वीजनिर्मितीबाबत महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे आणि महापारेषणविषयी मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी सादरीकरण केले. ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल असलेल्या सूचना, समस्या व तक्रारी गांभिर्याने समजून घेऊन त्या प्राधान्याने निर्धारित मानकाप्रमाणे सोडविण्याची गरज पाठक यांनी नमूद केली.
हेही वाचा : मराठा आंदोलनाची जायकवाडीच्या विसर्गाला झळ; काही धरणांची संयुक्त पाहणी रखडली
ग्रामीण, शहर, उद्योग व शेती यांना कायमस्वरूपी व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी सरकारने वीज निर्मिती, पारेषण तथा वितरण याचे जाळे मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व सुधारीत वितरण क्षेत्र योजना सारख्या अनेक योजना आणल्या आहेत. भविष्यात राज्याला तसेच जिल्ह्याला लागणाऱ्या विजेसाठी या योजनांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत असूनही मागणीएवढी वीज उपलब्ध केली जात आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ऊर्जा विभागाने सेवेचा दर्जा आणखी वाढवून संवाद साधण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीला महावितरण, महापारेषण, महानिर्मिती महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाशी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.