नाशिक : महायुतीतील जागा वाटपाच्या घोळामुळे रखडलेल्या नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये रंगल्याचे समोर आले आहे. माघार घेतल्यानंतर सोमवारी रात्री त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. मोटारीत टॅबवर ते आयपीएलचे सामने बघत होते. आपण क्रिकेट सामना बघत असून मंगळवारी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले.
खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांव सुचवूनही नाशिकच्या जागेवर महायुतीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देता आली नाही. निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचे कारण देत भुजबळ हे स्वत:च स्पर्धेतून बाजूला झाले. त्यांच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. तथापि, भाजपने या जागेवर पुन्हा दावा सांगितल्याने महायुतीतील घोळ कायम आहे. उमेदवाराची घोषणा करण्यात बराच विलंब झाल्यामुळे भाजपही नाराज आहे. भाजपच्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत माघारीची घोषणा केल्यानंतर छगन भुजबळ हे सोमवारी रात्री प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. प्रवासात ते आयपीएलचे क्रिकेट सामने पाहण्यात मग्न होते. भुजबळ फार्म येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधताना त्यांनी राजकीय प्रश्न टाळून टॅबवर आयपीएल क्रिकेट सामन्याचा स्क्रिन दाखवला. सध्या क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊ द्या, मंगळवारी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी फारसे बोलणे टाळले.
हेही वाचा : नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत
दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. भुजबळ फार्म येथे ही बैठक होईल. त्यात भुजबळ हे सहभागी होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बैठकीत भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्याबाबत झालेला विलंब, अखेरीस घ्यावी लागलेली माघार यावर मुख्यत्वे चर्चा होण्याचा अंदाज आहे.