नाशिक: आरक्षणाच्या नाजूक प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीऐवजी काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याचा पर्याय शरद पवार यांनी सुचवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ते लवकरच या बैठकीचे नियोजन करण्यास सांगणार आहेत. या प्रश्नावर काही मोजके नेते चर्चा करून काय मार्ग काढता येईल, यावर विचारविनिमय करतील, असे पवार यांनी सांगितल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुजबळ यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मुंबईहून नाशिकला आल्यावर मंगळवारी भुजबळ यांनी पुन्हा या भेटीवर भाष्य केले. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. हा राजकारणाचा विषय नाही. यात महायुती सरकारची राजकीय कोंडी नव्हे तर, ग्रामीण भागात सामान्यांची कोंडी होत आहे. राजकीय कोंडी होत असते आणि सुटत असते. पण हा सामाजिक प्रश्न आहे. असे प्रश्न सोडवण्याचा पवार यांचा अनुभव मोठा आहे. प्रत्येक खेड्यात कोण कसा, हे त्यांना माहिती आहे. आमच्यापैकी सर्वांना ती माहिती असणे शक्य नाही. पवार यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे, असा आग्रह आपण त्यांच्याकडे धरल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

हेही वाचा : नाशिक-मुंबई महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी उपाय, भिवंडीतील अवजड वाहनांसाठी वेळमर्यादेचे नियोजन

सर्वपक्षीय बैठकीत ५० ते ६० नेते उपस्थित असतात. नाजूक प्रश्नावर चर्चा कशी करणार, असा प्रश्न पवार यांनी केला. या प्रश्नावर दोन-चार जणांमध्ये चर्चा होऊ शकते. फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही, असे त्यांनी सूचित केले. यावर या बैठकीत कुणाला बोलवायचे हे तुम्हीच ठरवा असे आपण त्यांना सांगितल्याचे भुजबळांनी नमूद केले. या विषयात लक्ष देण्याचे पवार यांनी मान्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच संपर्क साधून ते बैठकीत कुणाला बोलवायचे हे सांगणार असल्याचे भुजबळ यांनी मांडले. राष्ट्रवादीतील बंडानंतर तब्बल वर्षभराने भुजबळ हे पवारांना भेटले. पवार यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाचे त्यांनी कौतुक केले. आपण दोन नेत्यांच्या हाताखाली काम केले. त्यांचे मन मोठे आहे. शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांनी परस्परांवर यथेच्छ टीका केली आहे. परंतु, भेटल्यानंतर हसतखेळत जणू काही झालेच नाही असे ते वागायचे. म्हणून ही माणसे मोठी आहेत. परस्परांचे हेवेदावे करणारी माणसे फार मोठी होत नाहीत, असे भुजबळ यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik chhagan bhujbal on meeting with sharad pawar over maratha and obc reservation issue css