नाशिक : शहरात हत्यांचे सत्र चालूच आहे. सिडकोतील कामटवाडे परिसरात संत कबीर नगरातील १७ वर्षाच्या विधीसंघर्षित मुलाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूर हद्दीतील एका हत्येच्या गुन्ह्यात समावेश असल्याच्या संशयावरुन विधीसंघर्षित बालकास बालसुधार गृहात पाठविण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वी तो तेथून बाहेर आला होता. जीवाला धोका असल्याबाबत त्याने आई वडिलांना सूचित करून सिडकोतील कामठवाडे येथे एका मित्राच्या घरी तो राहत होता.

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो कामठवाडे येथील स्मशानभूमी रस्त्याने जात असतांना पाच ते सहा जणांनी त्याला गाठले. त्याला मारहाण केली. दगड आणि फरशी डोक्यात टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी पाहणी केली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड परिसरात वाढते गुन्हे

अंबड येथील सराफ व्यावसायिकाच्या दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांची बदली झाली. सध्या राकेश हांडे निरीक्षक असून त्यांच्या कार्यकाळात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिसरी हत्या झाली आहे. याआधी होळीच्या रात्री शुभम पार्क परिसरात आणि संभाजी स्टेडियमजवळ सिगारेटच्या वादातून हत्या झाल्या होत्या. पोलिसांचा कोणताही धाक गुंडांवर नसल्यानेच सलग हत्या होत असल्याची नागरिकांची भावना आहे.