नाशिक : सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच जटील होत चालला असून मंगळवारी रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय कार्यालयात आंदोलन केले. संतप्त रहिवाशांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताना उग्र भाषा वापरल्याने विभागीय अधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले.

आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांना शिवीगाळ झाल्याचेही सांगण्यात येते. एका अधिकाऱ्याला हात जोडून माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. आंदोलनावेळी सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र धारणकर, एजाज काझी, जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. आंदोलनात माजी नगरसेविका छाया देवांग, सुधाकर जाधव, अंकुश वराडे, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, अजिंक्य गीते, सुबोध नागपुरे आदींसह अनेकांचा सहभाग होता.

काही आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर माठ फोडण्याचा, काळे फासण्याचा तसेच शाई टाकण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांना हातवारे दाखवत, टाळ्या वाजवत निषेध नोंदवण्यात आला. या प्रकारानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन संबंधित आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात चर्चा केली.

सिडको परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Story img Loader