नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर, दूरसंचार, इंटरनेट सेवा बळकटीकरणाच्या तयारीत असणाऱ्या भारत संचार निगमसमोर खोदकामांमुळे लांब पल्ल्याच्या वायर व तत्सम यंत्रणांच्या नुकसानीमुळे वारंवार सेवा बाधित होण्याचे संकट उभे ठाकले आहे. सहा महिन्यांत खोदकामामुळे २२६ ठिकाणी बीएसएनएलच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होऊन सुमारे ८५६ तास सेवा बाधित झाली. खोदकामाची पूर्वकल्पना होण्यासाठी सरकारने सीयूबीयूडी ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर न करता खोदकाम करून दूरसंचार यंंत्रणेत बाधा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) भूमिका महत्वाची आहे. या दोन्ही ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी बीएसएनएलने आतापासून तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बीएसएनएलच्या पायाभूत सुविधा व संपर्क यंत्रणांचे नुकसान टाळणे, विविध सरकारी, खासगी संस्थांनी सीयूबीयूडी ॲपचा वापर करणे, या विषयावर बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक सारंग मांडवीकर, व्यवस्थापक ए. पी. गायकवाड, विभागीय अभियंता एस. ए. भदाणे आदी उपस्थित होते.

संपर्काची १०० टक्के उपलब्धता होण्यासाठी प्रयत्न करावेत. बीएसएनएलची सर्व क्षेत्रांशी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि आपत्कालीन सेवा प्रदात्याशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका आहे. पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे सूचित करण्यात आले.

खोदकामाची झळ

महानगर गॅस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, नाशिक महानगरपालिका, महावितरण आदींच्या खोदकामाचा फटका भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलला बसत आहे. ऑगस्ट २०२६ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत खोदकामामुळे २२६ ठिकाणी पायाभूत सुविधांचे नुकसान होऊन दोष उद्भवले. त्यामुळे ८५६ तास सेवा खंडित राहिल्याची माहिती विभागीय अभियंता शशिकांत भदाणे यांनी बैठकीत दिली. महानगर गॅस कंपनीने इगतपुरी-नाशिक दरम्यान केलेल्या खोदकामुळे बीएसएनएलच्या लांब अंतराच्या वायर उद्ध्वस्त झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. या माहितीने जिल्हाधिकारी जलज शर्मा हे देखील अवाक झाले.

ठेकेदाराचे देयक रोखणार

शासकीय कार्यालयांना दूरध्वनी (लँडलाईन) आणि इंटरनेट सेवा (ब्रॉडबँड) सेवेने संलग्न करण्यासह बँका व विविध आस्थापनांना लीज लाईनची सेवा बीएसएनएलकडून दिली जाते. अतिविशेष व्यक्तींच्या दौऱ्यावेळी हॉटलाईनची सेवा उपलब्ध केली जाते. या सर्वांची भिस्त दूरवरील (आंतरजिल्हा) वाहिन्यांच्या (वायर) जाळ्यावर आहे. पूर्वकल्पना न देता होणाऱ्या खोदकामामुळे सेवेत अडथळे येत असल्याने प्रशासनाने ॲपचा वापर न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि ठेकेदाराच्या देयकातील काही भाग रोखावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले.

Story img Loader