नाशिक : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मल वाहिका आणि पावसाळी गटारींची कामे केली जाणार असल्याने पंचवटीतील सेवाकुंज ते गजानन चौक आणि नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर एकेरी बाजूने वाहनांना प्रवेश दिला जाईल. तसेच दोन्ही मार्गांवर ना वाहनतळ क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडून उपरोक्त भागात पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जात आहेत. परिसरातील वाहतुकीच्या नियमनासाठी ही कामे पूर्ण होईपर्यंत शहर वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल केले असून यासंबंधीची अधिसूचना पोलीस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी प्रसिध्द केली. त्यानुसार सेवाकुंज ते गजानन चौक पर्यंतचा रस्ता आणि अमरधाम ते शिवाजी चौक पर्यंतच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा…नाशिक महानगरपालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे ; भाजप आमदाराचा संताप
सेवाकुंज ते गजानन चौक या मार्गावरील वाहतूक या रस्त्याच्या पूर्व बाजूकडील समांतर रस्त्यावरून होईल. अमरधाम ते शिवाजी चौक पर्यंतच्या बाजूकडील समांतर रस्त्याचा पर्यायी वापर करावा लागेल. रस्त्यावर वाहनांना एकेरी मार्गाने प्रवेश सुरू राहणार आहे. सेवाकुंज ते गजानन चौक या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस कामाच्या ठिकाणी नमूद मार्गावर ६० दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना ना वाहनतळ क्षेत्र करण्यात आले आहे. नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक या रस्त्याच्या दुतर्फा ९० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ना वाहनतळ क्षेत्र राहणार आहे. वाहनधारकांनी अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अपघात झाल्यास कंपनी, ठेकेदार जबाबदार
वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी आणि ठेकेदाराने उपरोक्त मार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळ्या लावणे, रात्री व दिवसा वाहनधारकांना दिसेल अशा प्रकारे प्रवेश बंद करणे. ना वाहनतळ क्षेत्राचे रेडिअम फलक व चालू-बंद होणारे दिवे (ब्लिंकर्स) लावणे बंधनकारक आहे. दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी व कंत्राटदारावर राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. वाहतुकीतील हे बदल सेवाकुंज ते गजानन चौक मार्गावर ६० दिवस तर अमरधाम ते शिवाजी चौकपर्यंतच्या मार्गावर ९० दिवसांसाठी अमलात राहणार आहेत.