नाशिक : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता सोमवारी शहरातील काही भागात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.भद्रकाली पोलीस ठाणे अंतर्गत फाळके रोड ते दूध बाजार, बादशाही कॉर्नर, महात्मा फुले पोलीस चौकी ते चौक मंडई या ठिकाणी बाजार भरत असल्याने ईद सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवाची गर्दी असते.

ईदच्या दिवशी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील ईदगाह मैदानावर शहराच्या विविध भागातून मुस्लीम बांधव नमाज पठणासाठी येतात. यावेळी होणारी वाहनांची गर्दी पाहता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रविवारी दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत दूध बाजार चौक ते फाळके रोड, फाळके राड ते चौक मंडई, चौक मंडई ते महात्मा फुले पोलीस चौकी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. तसेच ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल, सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल, भवानी सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करत वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ

भद्रकाली तसेच ईदगाह मैदानावर ईदसाठी होणारे नमाज पठण पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दूधबाजार चौक, फाळके रोड टी पॉईंट, चौक मंडई, महात्मा फुले चौकी, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, सीबीएस सिग्नल आदी ठिकाणी बंदोबस्त राहणार आहे.