नाशिक :अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने अनेक बैलगाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजनाच्या लयीत मागण्या मांडल्या गेल्या. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाने अलीकडेच दिंडोरीत ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. आता ठाकरे गटाने बैलगाडी मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
अवकाळी पावसात जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याऐवजी सत्ताधारी घटक पक्ष निवडणूक प्रचारात दंग राहिले. ही शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टा असल्याचा आक्षेप घेत ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. शालिमार येथील पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यात २० हून अधिक बैलगाड्या, काही ट्रॅक्टर सहभागी करण्यात आले. एका बैलगाडीचे सारथ्य ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. काही बैलगाड्यांमध्ये काही जण टाळ-मृदुंग घेऊन बसले होते. त्यांच्यामार्फत भजनाच्या सुरात शेतकऱ्यांची समस्या मांडली जात होती. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरवर भगवे झेंडे लावून ठाकरे गटाने चांगलीच वातावरण निर्मिती केली. ठाकरे गटाचे नेते सुनील बागूल, माजी नगरसेवक विलास शिंदे आणि अन्य पदाधिकारी पायी मार्गस्थ झाले. महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा… प्रतिकूल शेरा असतानाही पुण्यात प्रयोगशाळा, आरोग्य विद्यापीठाच्या लेखा परीक्षणात ठपका
गेल्या वर्षी अवकाळीने शेतीचे नुकसान झाले होते. ती भरपाई अद्याप मिळाली नसताना पुन्हा तसेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले. तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या पाण्यासाठी उपाययोजना, जनावरांना चारा उपलब्ध करावा, पीक विम्यातील जाचक अटी निकष रद्द करावेत, सरसकट पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live: छगन भुजबळांवर मनोज जरांगेची एकेरी भाषेत टीका, म्हणाले..
पीक विमा कंपन्यांकडून दिशाभूल
पिकांच्या नुकसानीबाबत पीक विमा कंपनीला ऑनलाईन अथवा फोनद्वारे ७२ तासांच्या आत कळवण्याची अट आहे. परंतु, या या कंपनीचे संकेतस्थळ बंद आहे. संपर्कासाठी दिलेले दूरध्वनी क्रमांकावर संपर्क होत नाही. विमा कंपन्या जाणीवपूर्वक संकेतस्थळ व दिलेले संपर्क क्रमांक बंद ठेऊन विमाधारक शेतकऱ्यांना मानसिकव आर्थिक त्रास देऊन फसवणूक करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. सरकारने विमा कंपन्यांना ताकीद देऊन शेतकऱ्यांना पीक विम्यांची भरपाई देण्यास बाध्य करावे, अशी मागणी करण्यात आली.