नाशिक: गंगापूरच्या बळवंतनगर भागात जलवाहिनी फुटल्याने सोमवारी शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. ज्या ठिकाणी ही जल वाहिनी फुटली, तिथेच १२०० मीटर व्यासाच्या दोन मुख्य जलवाहिन्या आहेत. प्रारंभी, नेमकी कुठली जलवाहिनी फुटली, याची स्पष्टता नसल्याने गोंधळ उडाला. सर्व वाहिन्यांचा पाणी पुरवठा थांबवून तपासणी केली गेली. त्यानंतर ५०० मीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याचे दिसले आणि पाणी पुरवठा विभागाचा जीव भांड्यात पडला. मुख्य जलवाहिनी फुटली असती तर, संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला असता, असे या विभागाचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. परंतु, फुटलेल्या जल वाहिनीची झळ अनेक भागांना बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गंगापूर धरण तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाणी वितरण प्रणालीतील दोषामुळे वारंवार पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. चार ते पाच महिन्यांत महापालिकेने अनेकदा विशिष्ट काही भागातील किंवा संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकेक दिवस बंद ठेऊन दुरुस्तीची कामे केली होती. परंतु, जल वाहिन्यांमधील दोष कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो. थेट जलवाहिनीद्वारे धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. केंद्रात प्रक्रिया होऊन ते वितरित होते. बळवंतनगर भागात सकाळी जल वाहिनीला गळती लागल्याचे समोर आले. ध्रुवनगर, बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य, नहुष जलकुंभ भरणारी शुध्द पाणी पुरवठा करणारी वाहिनी फुटली. त्यामुळे प्रभाग क्रमांक सात, आठ, नऊ, १२ येथील पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे. या ठिकाणी एक लहान आणि दोन मुख्य जलवाहिन्या आहेत. यातील नेमक्या कोणत्या वाहिनीला गळती लागली, हे तपासण्यासाठी शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा बंद केला. तिन्ही वाहिन्यांचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

हेही वाचा : नाशिक: रिक्षाचालक हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात

पाणी पुरवठा विभागाने युध्दपातळीवर मोहीम हाती घेतली. तपासणीअंती ५०० मीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याचे दिसले. १२०० मीटर व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्या सुरक्षित असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले. ही स्पष्टता झाल्यानंतर पंपिंग पुन्हा सुरू करून दोन्ही मुख्य जल वाहिन्यांमधील पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. गळती लागलेल्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सायंकाळपर्यंत ते पूर्णत्वास जाण्याचा अंदाज आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्याची धास्ती पसरली होती. तपासणीअंती ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मोठे संकट टळले. त्या जलवाहिनीला गळती लागली असती तर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बाधित झाला असता, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुकणे धरणातील पाणी ज्या भागात पुरवले जाते, त्या सिडको, पाथर्डी, इंदिरानगर व द्वारका परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होता. दुरुस्ती कामासाठी एक दिवस लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात वृद्ध दाम्पत्याला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप; देवाच्या दारी भक्तांशी मुजोरी?

अन्य ठिकाणीही गळती

सातपूरमधील महिंद्रा चौक परिसरातील अन्य एका जल वाहिनीतून दोन, तीन दिवसांपासून गळती सुरू आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाने सिमांकन केले आहे. परंतु, त्वरीत कार्यवाही करण्यात आलेली नाही. दुरुस्तीअभावी तिथेही पाणी वाहून जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik city water supply disrupted due to burst water pipeline css