नाशिक : ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन न दिल्याच्या कारणावरून वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे मंगळवारी महापालिकेची सिटीलिंक बस सेवा विस्कळीत होऊन प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. चार महिन्यांपूर्वी ऐन परीक्षा काळात सिटीलिंकची बस सेवा अशीच ठप्प झाली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकाराला प्रवासी वैतागले आहेत. ठेकेदारांच्या राजकारणाने ही स्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते.
महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याने मे आणि जून अशा दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्याची वाहकांची तक्रार आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ५०० वाहकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, मंगळवारी सकाळपासून सिटीलिंकच्या २०० हून अधिक बस तपोवन आणि नाशिकरोड आगारात उभ्या आहेत. वाहकांना पंचवटीत आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ते नाशिकरोड आगाराकडे निघून गेल्याचे सांगितले जाते. आगारातून बस बाहेर न पडल्याने इतरांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. या स्थितीचा रिक्षा चालकांनी फायदा घेतला. जादा भाडे आकारून त्यांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… जळगाव: पाचोर्यानजीक बस-मालमोटार अपघातात १५ विद्यार्थी जखमी
सिटीलिंकच्या सुमारे २५० बसेस शहर व ग्रामीण भागात धावतात. हजारो पासधारक विद्यार्थी सिटीलिंकने प्रवास करतात. सकाळी विविध थांब्यांवर त्यांना तिष्ठत रहावे लागले. बससेवा बंद असल्याची माहिती समजल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. अनेक पासधारक विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. नोकरदार वर्गाचे हाल झाले. वाहकांनी काम बंद केल्याने शेकडो चालकांना हातावर हात धरून बसून रहावे लागले.
कुठलीही रक्कम सिटीलिंकने थकवलेली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले. दरवेळी याच कारणावरून प्रश्न उद्भवतो. सिटीलिंक बस सेवेत ५५० वाहक कंत्राटी स्वरुपात घेण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याला देयक सादर झाल्यावर ठेकेदाराला रक्कम दिली जाते. ठेकेदारांमधील अंतर्गत वादातून वाहकांच्या वेतनाचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असून त्यात सामान्य प्रवासी, विद्यार्थी, महापालिका व सिटीलिंक कंपनी भरडली जात आहे. या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.