नाशिक : डॉ. शोभा बच्छाव यांचा जन्म धुळ्याचा आहे. म्हणजे त्यांचे धुळे हे माहेर आहे तर, मालेगावचे सासर आहे. एखादी कन्या नाशिकला येऊन आपले कर्तृत्व निर्माण करीत असेल तर त्यात कमीपणा करायला नको, अशा शब्दांत काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात ’बाहेरील उमेदवार‘ लादल्याची टीका करणाऱ्या स्वकियांना फटकारले. आपल्याला देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी काम करायचे आहे. त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत उफाळून आलेला असंतोष शमवण्यासाठी थोरात यांच्या उपस्थितीत येथे काँग्रेस कार्यालयात मेळावा घेण्यात आला. नवनिर्वाचित प्रभारी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आपली नाराजी उघडपणे प्रगट केली. आपल्या कार्यकाळात ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी मदत केली, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आल्याचे नमूद केले. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी थोरात यांनाही टोले हाणले. आपण आता काँग्रेसचे केवळ कार्यकर्ते असून कुठल्याही व्यासपीठावर उपस्थितीचे आपल्याला बंधन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने मेळाव्यातून पक्षांतर्गत नाराजी कायम राहिल्याचे अधोरेखीत झाले.

हेही वाचा : रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध

धुळे मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. बच्छाव यांना मालेगावमध्ये रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिकांना डावलून बाहेरील उमेदवार लादल्याचे आरोप झाले. मेळाव्यात थोरात यांनी डॉ. बच्छाव यांची माहिती कथन करीत स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. जिल्ह्यातील तीनही जागेवर महाविकास आघाडीचे आपल्याला काम करायचे आहे. देशात भाजप विरोधात वातावरण आहे. लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे सर्वांनी जोमाने काम करण्याची गरज त्यांनी मांडली. नूतन अध्यक्ष कोतवाल यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सर्वांच्या सहकार्याची गरज व्यक्त करीत हात उंचावून उपस्थितांचा प्रतिसाद जाणून घेतला. बुधवारी रामनवमी साजरी होत आहे. कुटुंबवत्सल रामाची आपण पूजा करतो. रामनवमीसह सर्व धर्मियांच्या सणोत्सवात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक

प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी शरद आहेर यांनी, धुळे लोकसभेच्या मागील निवडणुकीत मालेगाव बाह्य आणि बागलाणमधून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यांना शह देण्यासाठी पक्षाने या भागातील उमेदवार दिल्याचे नमूद केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत त्याचा निषेध करीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान

उकाड्याने जलधारा

सभागृहात गर्दी झाली असली तरी बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नव्हती. एखादा अपवाद वगळता पंखे नव्हते. यामुळे उभे राहून मेळाव्यात सहभागी झालेले कार्यकर्ते अक्षरश: घामाघूम झाले. व्यासपीठावर नेतेमंडळींची वेगळी अवस्था नव्हती. पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात ते अडकले होते. तासाभरानंतर खुर्च्या मागविल्या गेल्या. यातील अर्ध्या तळमजल्यावर तर अर्ध्या सभागृहात आल्या. उपस्थितांना बसण्यासाठी जागा मिळाली. परंतु, व्यासपीठावर उभे राहणाऱ्यांची गर्दी काही कमी झाली नाही. उकाड्याने जलधारांची अनुभूती नेत्यांसह कार्यकर्त्यांना घ्यावी लागली.