नाशिक: शहरातील गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष वाचविण्यासाठी जमलेल्या पर्यावरणप्रेमींना मंगळवारी सुनावणीसाठी जमलेल्या एका गटाने मारहाण केली. अकस्मात घडलेल्या या घटनेने धास्तावलेल्या वृक्षप्रेमींनी पोलिसात धाव घेतली. वृक्षप्रेमींनी मद्यपान करून वाहन चालविले जात असल्याने अपघात घडतात, असे विधान केल्यामुळे स्थानिक रहिवासी चिडले. वृक्ष हटविण्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाले. आपण मध्यस्थी करून वाद मिटवला, असा दावा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी केला. या घटनाक्रमाची तक्रार वृक्षप्रेमींनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
गंगापूर रस्त्याच्या मध्यभागी तसेच लगत काही वृक्ष आहेत. या वृक्षांना धडक बसून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. न्यायालयाने स्थानिकांचे म्हणणे जाणून रस्त्यातील झाडांबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने रस्त्यातील वटवृक्षाबाबत नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मंगळवारी हरकती व सूचना मांडण्याचे आवाहन केले होते. वाढत्या अपघातामुळे काही सामाजिक संस्था, पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी त्यांचे पुनर्रोपण करण्याची आवश्यकता मांडली. ज्या ठिकाणी हा वटवृक्ष आहे, तो शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांचा प्रभाग आहे. तेही सुनावणीस उपस्थित होते. वटवृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमी आले होते. आम्हाला बोलण्याची संधी दिली नसल्याची तक्रार त्यांनी केली. तिथेही वटवृक्ष वाचविण्याचे समर्थन करणाऱ्यांना दमदाटी झाल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी रस्त्यावरील संबंधित वटवृक्षाच्या ठिकाणी जमले असता या काळात कुणीतरी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शिंदे यांच्याबाबत तक्रार केल्याचे सांगितले जाते. गंगापूर रस्त्यावरील अनेक मोठी झाडे याआधीही रस्ता रुंदीकरण व अपघाताच्या नावाखाली तोडली गेली आहेत. मात्र रस्ता मोठा न होता तिथे हॉटेल ,बार आणि व्यापारी संकुलांसाठी वाहनतळ झाल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. शहरातील वड, पिंपळ आदी देशी झाडांचा आधीच बळी घेतला गेला असून हे वटवृक्ष वाचविण्याची आग्रही मागणी वृक्षप्रेमींनी केली. काही वेळात ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याबद्दल विचारणा केल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले. रस्त्यावरील वृक्ष हटविण्यावरून दोन गट पडले. पर्यावरणप्रेमींनी वटवृक्ष हटविण्यास विरोध कायम ठेवल्याने राजकीय नेत्यांच्या गुंडाकडून मारहाण झाल्याची तक्रार वृक्षप्रेमींनी केली. महिलांवरही हात उगारला गेला. या घटनेनंतर पर्यावरणप्रेमींनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
वृक्षप्रेमींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. गंगापूर रस्त्यावरील वटवृक्ष तोडण्याच्या विषयात दोन गट पडले आहेत. एका गटाचा झाड काढण्यास विरोध तर, स्थानिकांचा दुसरा गट झाड काढावेत म्हणून आग्रही आहे. रस्त्यात झाड असल्याने वारंवार अपघात होत असल्याचे या गटाचे म्हणणे होते. आजवर ३४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. झाडे काढावीत म्हणून २०० ते ३०० स्थानिक रहिवासी आणि अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्य सुनावणीला उपस्थित होते. वृक्षप्रेमींची संख्या तुरळक होती. मद्यपान करून वाहन चालवले जात असल्याने अपघात घडत असल्याचा तर्क वृक्षप्रेमींनी मांडला. यामुळे वृक्ष हटविण्यासाठी आग्रही असणारा गट चिडला. दोन्ही गटात बाचाबाची झाली. वृक्षप्रेमी मोठ्या आवाजात बोलत होते. वाद वाढल्याने आपण मध्यस्थी करून तो मिटवला.
विलास शिंदे (महानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)
नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष वाचविण्यासाठी जमलेल्या पर्यावरणप्रेमींना मंगळवारी सुनावणीसाठी जमलेल्या एका गटाने मारहाण केली. अकस्मात घडलेल्या या घटनेने धास्तावलेल्या वृक्षप्रेमींनी पोलिसात धाव घेतली. pic.twitter.com/0FK75bSmGy
— LoksattaLive (@LoksattaLive) July 2, 2024
हेही वाचा : नाशिक: नवीन कायद्यांविरोधात आंदोलन
गंगापूर रस्त्यावरील वटवृक्षासंबंधी माहिती घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा फोन आला होता. सुनावणीवेळी घडलेली वस्तूस्थिती आपण मांडली. वारंवार अपघात होत असल्याने रस्त्यातील वृक्ष तोडावा, अशी बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे. मनपाच्या सुनावणीत संबंधितांनी तेच मांडले. वृक्षप्रेमींनी चिथावणीखोर विधाने केल्याने स्थानिक रहिवासी चिडले. त्यांनी वृक्षप्रेमींना धक्काबुक्की केली. या विषयात आदित्य ठाकरे यांनी वटवृक्ष वाचविणे आणि रस्ता वाहतुकीस खुला राहील, अशी रचना करण्याविषयी मुंबईतील वास्तुविशारदांकडून मार्गदर्शन घेण्याचे आश्वासन दिले आहे.
सुधाकर बडगुजर (जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गट)