नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरातील महादेव मंदिराजवळील देवनदीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात प्रशासन आणि संबंधित ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. प्रशासनाने पूल तोडण्यास परवानगी दिली नसल्याचे कनिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे तर, गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचा ठेकेदाराचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वणी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्ती कामास परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून आदिवासी उपयोजनेतून मंजुरी मिळाली. तीन कोटी ५० लाख रुपये यासाठी मंजूर झाले. काम युद्धगतीने चालू झाले. ३० मीटरचा पूल आणि २५० मीटर लांबीचा रस्ता या माध्यमातून होणार आहे. पावसाळयात वणी आणि विश्रामबाग पाडा यादरम्यान असलेल्या देवनदीला पूर आल्यास दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. वणी शहराजवळ प्राचीन तिळेश्वर महादेव मंदीर आहे. नदीपलीकडच्या बाजूला गावातून मंदिर परिसरात जा-ये करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात दगडी पूल बांधण्यात आला होता. या पुलाच्या बाजूला नवीन पूल होत असून शेकडो वर्षांपूर्वीचा दगडी पूल पाडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. प्राचीन पूल असल्याने शहरातील नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यावर प्रशासन आणि ठेकेदारांनी यासंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी ढकलणे सुरु केले आहे.

हेही वाचा : कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आदेश नव्हते. संबंधित ठेकेदारास ऐतिहासीक पूल तोडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. कुठल्याही गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा आदेश पाहणी करून दिलेला नाही.

अभिजित कांबळे (अभियंता, बांधकाम विभाग शाखा)

गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या एका महिला अधिकाऱ्यांनी सर्वे करून शेतीसाठी जूना पूल अडथळा ठरत असल्याचे सांगितले असून त्यामुळे तो काढण्यात आला.

प्रशांत देवरे (ठेकेदार)
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik controversy over demolition of historic bridge near vani css
Show comments