जळगाव : शहरात सार्वजनिक मंडळांतील गणपती दर्शनासाठी भक्तांमध्ये आतुरता दिसून येत आहे. देखावे, आरास पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमुळे शहराला सायंकाळी यात्रेचे स्वरूप येते. यानिमित्ताने रस्त्यांवरच ठाण मांडलेल्या विविध वस्तू व्यावसायिकांचीही चांदी होत असून, दिवसाला सुमारे दीड कोटींवर उलाढाल होत आहे. त्यात परराज्यांतील व्यावसायिकांचा सर्वाधिक समावेश आहे. टवाळखोरांकडून अधिक त्रास असल्याचे विक्रेत्या महिलांकडून सांगण्यात आले. महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून विसर्जनाबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासारखे असून, त्यात चांद्रयान-३ या देखाव्यासह धार्मिक व समाजप्रबोधन करणार्या देखाव्यांचे आकर्षण आहे. अखेरच्या दोन दिवसांत देखावे पाहण्यासाठी आणखी गर्दी उसळणार असून, मंडळांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांकडून त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. नेहरू चौक ते टॉवर चौक, विसनजीनगर, बळिरामपेठ, नवीपेठ, जयकिसनवाडी, रेल्वेस्थानक रस्ता आदी भागांत सर्वाधिक सार्वजनिक मंडळे असल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप येत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताकामी दिमतीला आहेत. ते रात्री बारापर्यंत कर्तव्यावर असतात.
हेही वाचा : येवल्यात रहिम शेख यांच्या घरी गणेश, हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा
दिवसाला सुमारे दीड कोटींवर उलाढाल
शहरातील नेहरू चौक, टॉवर चौक, शनिपेठ, विसनजीनगर या दोन-तीन किलोमीटर परिघात सर्वाधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध विषयांवर देखावे साकारले आहेत. या परिसरात दुपारी तीनपासून सुमारे साडेतीन हजारांवर व्यावसायिकांकडून दुकाने थाटली जात आहेत. मात्र, यात परराज्यांतील व्यावसायिकांचा सुमारे ८० टक्क्यांवर सहभाग आहे. त्यांच्याकडे मुलांसाठी चिनी बनावटीच्या वस्तूंसह महिलांसाठीच्या साजश्रृंगाराचे साहित्य सर्वाधिक विक्रीसाठी आहेत. त्यातून रोज सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत आहे. शिवाय, परिसरातील खुल्या भूखंडांवर मुलांसाठी पाळणे, झुले लागले आहेत. तेथेही मुले खेळण्यांचा आनंद घेत आहेत.
हेही वाचा : धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नाही, डाॅ. विजयकुमार गावित यांची ग्वाही
उत्तर प्रदेशातील कपड्यांचे व्यावसायिक मोहम्मद सादवी यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून जळगावात आलो आहे. दिवसभरात सुमारे आठ ते दहा हजारांची विक्री होते. राजस्थानमधील शोभेच्या वस्तूंचे विक्रेते रवींद्र प्रजापत, प्रवीण चौधऱी यांनी सांगितले की, शोभेच्या वस्तूंना चांगली मागणी आहे. दिवसभरात पाच ते सात हजारांची कमाई होते. विविध प्रकारचे मुखवटे, फुगे, चेंडू यांसह अन्य साहित्य विक्री करणाऱ्या महिलेने टवाळखोरांकडून अधिक त्रास होत असल्याची तसेच ते वस्तू चोरत असल्याची व्यथा मांडली. तसेच व्यवसाय चांगला होत असल्याचे सांगितले. शिवाय, विविध खाद्यपदार्थ विक्रीतूनही मोठी विक्री होत असून, शीतपेय अर्थात आईस्क्रीम, फालुदा, विविध प्रकारच्या कुल्फी यांसह दुग्धजन्य पदार्थ विक्रीतूनही २० ते २५ लाखांची उलाढाल होत आहे.
हेही वाचा : नाशिक : विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करण्याची सूचना; पोलीस-गणेशोत्सव मंडळ बैठक
विसर्जनासाठी महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज
बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला अर्थात २८ सप्टेंबरला होणार आहे. त्यासाठी महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक भागांत रस्ते खड्डेमय झाले आहेत. वाहनचालकांना तर कसरतच करावी लागत आहे. सद्यःस्थितीत पावसाने रस्ते चिखलमय झाले आहेत. आता गणेश विसर्जनही जवळ येत आहे. त्यामुळे खड्डेमय रस्ते दुरुस्तीची मागणी होत असून, त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी विसर्जन मार्गांची पाहणीही केली. त्यानुसार त्यांनी विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. मेहरुण तलावाकडून मार्गांची दुरुस्ती करण्यात आली आहे. काही रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे शिवाजीनगर पुलापासून दूध फेडरेशन रस्त्यासह संबंधित रस्त्यांतील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग बुजविणार आहे, असे आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा : नाशिक : इगतपुरीजवळील अपघातात दोन जणांचा मृ़त्यू
मेहरुण तलावातील गणेश घाट व सेंट टेरेसा स्कूलमागील भागात मूर्ती विसर्जन होईल. शहरासह विविध भागांतील सार्वजनिक मंडळ व घरगुती निर्माल्य संकलनासाठी पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. एका ठिकाणी ३५ कामगार नियुक्त केले असून, काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, आकाशवाणी चौक, सिंधी कॉलनी, कोर्ट चौक व सुभाष चौकात निर्माल्य संकलित केले जाईल. महापालिकेचे कर्मचारी, कामगार, मुकादम, आरोग्य निरीक्षकांसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाची वाहने व मजूरही दिमतीला असतील. मेहरुण तलावानजीक दोन्ही ठिकाणी मुकादम व प्रत्येकी पाच सफाई कामगार नियुक्त केले जातील. तेथे संकलित होणार्या निर्माल्यातून मेहरुण वनीकरणात खतनिर्मिती केली जाणार आहे.
हेही वाचा : नाशिक: ऑनलाईन व्यवसाय शोधणे महागात; युवकाची २४ लाख रुपयांना फसवणूक
शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून मिरवणुकांवर नजर राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ड्रोन कॅमेरा खरेदी करण्यात आला असून, तो वेगवेगळ्या दहा ठिकाणी फिरेल. पूर्णवेळ ड्रोन कॅमेरा मिरवणूक व आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवेल. गर्दी नियंत्रित करणे, शांतताभंग होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.