नाशिक : गोदावरीचे उगमस्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वत परिसरात अवैध उत्खननास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यासाठी संवर्धन क्षेत्रात तातडीने सीमांकनाची गरज असल्याचे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी मांडले. मागील दोन दशकांत गोदावरी नदीची प्रकृती खालावत आहे. अतिदक्षता विभागात ठेवण्यासारखी तिची स्थिती असून त्यावर तातडीने उपचाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत चर्चासत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. मध्यंतरी ब्रम्हगिरी भागात अवैध उत्खनन झाल्याचे उघड झाले होते.
त्र्यंबकेश्वर परिसरात अशाप्रकारे अनेक डोंगर, टेकड्या भुईसपाट झाले आहेत. ब्रम्हगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. त्याच्या सभोवताली वनक्षेत्र असून त्याचे सीमांकन झालेले नाही. ब्रह्मगिरीवरील उत्खननाने बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारकडे दाद मागून हे संपूर्ण क्षेत्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती. शासनाने हे संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर केले. तथापि, आजतागायत जंगल क्षेत्राचे सिमांकन झालेले नाही. यावर जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी बोट ठेवले.
हेही वाचा : धुळ्यात राजकीय विरोधकांवर छाप्यांची परंपराच; काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्ह्यातील वनसृष्टी ही नद्यांची माता आहे. या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन स्तरावर जंगलाच्या सीमा निश्चित झाल्यास अतिक्रमण, जंगल तोड व डोंगरांचे उत्खनन थांबण्यास मदत होणार आहे. ब्रम्हगिरी पर्वतावर अनेक कुंड असून त्यांचे पुनरूज्जीवन केल्यास नद्यांची पाणी पातळी उगमस्थापासून वाढली जाईल. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून नाशिकची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून कायम ठेवल्यास पर्यावरणाचेही संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चर्चासत्रात अध्यात्मिक गुरू श्री एम, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य तथा नमामि गोदा फाउंडेशनचे प्रमुख राजेश पंडित, या उपक्रमाचे दूत अभिनेते चिन्मय उदगीरकर, सत्संग फाउंडेशनच्या एम. वसुकी, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : नाशिकमध्ये भंगार गोदामांना भीषण आग
सांडपाणी गोदावरीपासून वेगळे करा
मागील २० वर्षांपासून आपण गोदावरी नदीला भेट देत आहोत. या काळात नदीची प्रकृती खालावत जाऊन ती अतिदक्षता कक्षात दाखल झाल्यासारखी झाली. शहरातील मलजल थेट नदी पात्रात मिसळते. प्रक्रिया केलेले पात्रात सोडले जाणारे पाणी पात्रात फेसाळयुक्त स्थिती निर्माण करते. गोदावरीचे आरोग्य सुधारण्यासाठी सांडपाण्याला गोदावरीपासून वेगळे करण्याची गरज आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबाबत आतापासूनच आवश्यक उपाययोजनेची आखणी प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. नाशिकला पौराणिक व ऐतिहासिक वारसा असून दर १२ वर्षांनी येथे होणारा कुंभमेळा जागतिक स्तरावर अधोरेखित आहे. शहरात पूर्वीपेक्षा अधिक गर्दी वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : नाशिक : नानेगावजवळ बिबट्या जेरबंद
चार नद्यांसाठी कृती दल
पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. वालदेवी, कपिला, नंदिनी, म्हाळूंगी आणि मोती या नद्यांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर कृती दलाची निर्मिती करून प्रत्येक नदीसाठी एक अधिकाऱ्याची नेमणूक करून नदीसंबंधीचा अहवाल वेळोवेळी प्राप्त करून घेतला जाईल. नदी प्रदुषणमुक्तीसाठी व्यापक कार्यक्रमांची आखणी केली जाईल. ज्यातून चांगले बदल नक्कीच समोर येतील. समिती सदस्यांच्या सूचक चांगल्या योजनांचे स्वागत असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.