नाशिक : महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आणि द्वारका येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात डायलिसीस केंद्र करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मनपा रुग्णालयात ही सेवा नसल्याने रुग्णांना शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयात ताटकळत रहावे लागते. नव्या सुविधेमुळे रुग्णांना जलदपणे ही सेवा मिळू शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी १२ खाटांचे डायलिसीस केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसीस केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील रुग्ण डायलिसीस करण्यासाठी येतात. मनपा रुग्णालयात या प्रकारची सुविधा नसल्याने संदर्भ सेवा रुग्णालयातील केंद्रात मोठी गर्दी होते. रुग्णांना बरीच प्रतिक्षा करावी लागते. मनपाच्या रुग्णालयात डायलिसीस केंद्र कार्यान्वित केल्यास रुग्णांची विभागणी होऊन रुग्णांना लवकर ही सेवा देण्यात मदत होईल. नाशिक मनपाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १० ते १२ खाटांचे डासलिसीस केंद्र करण्याची मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार) सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी निवेदनाद्वारे केली होती.

हेही वाचा : आदिवासी विद्यार्थिनींना वेदनाशामक बॅगांचे वाटप

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सुमारे ७०० चौरस फूट जागा उपलब्ध आहे. या जागेलगत प्रसाधनगृह आहे. या ठिकाणी आवश्यक ते बदल करून केंद्र सुरू करता येईल. तर नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या तळघरात हे केंद्र कार्यान्वित होईल.

हेही वाचा : सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता

प्रत्येकी १२ खाटांची व्यवस्था

डॉ. झाकीर हुसेन आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १२ खाटांचे डायलिसीस केंद्र उभारण्यात येईल, यंत्रसामग्री, विद्युतीकरण, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कक्ष, प्राणवायू यंत्रणेसाठी व्यवस्था आदींना एका केंद्रासाठी दोन कोटी १० लाख रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या दोन्ही केंद्रांसाठी चार कोटी २० लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चाला सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik dialysis center service in two municipal hospitals css