नाशिक: दिंडोरी तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून वनारवाडी शिवारात १७ वर्षाच्या युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनारवाडी येथील विठ्ठल भीमा पोतदार (१७) हा गाई चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगर परिसरात गेला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास घराकडे परतत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळू भेरे यांनी वन विभागाला दिली.

हेही वाचा : नेपाळ बस अपघातातील मृतांमध्ये जळगावच्या काही भाविकांचा समावेश

वन अधिकारी अशोक काळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातून झाल्याची खात्री करून मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, याआधीही परिसरात कुत्रे, वासरांवर बिबट्याने हल्ला केला होता. या संदर्भात वन विभागाला कळवूनही दखल न घेतल्याने युवकाचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. आता तरी वन विभागाने बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे, अशी मागणी बाळू भेरे यांनी केली आहे.