नाशिक : धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील काही भागात भूजलाचा बेसुमार उपसा होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने अशा १५ पाणलोट क्षेत्रातील ३५७ गावांमध्ये वैयक्तिक लाभाच्या विहिरी व विंधनविहिरींवर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्यास बसला आहे.
गोदावरी, तापी पूर्व आणि पश्चिमी वाहिनी नद्या या तीन खोऱ्यांमधील ८० पाणलोट क्षेत्रात जिल्हा विभागला गेला आहे. गोदावरीत सर्वाधिक ३७ पाणलोट क्षेत्र आहेत, तापी पूर्वेला ३४ आणि पश्चिमवाहिनी नदी परिसरात नऊ क्षेत्र आहेत. जिल्ह्यातील ८० प्रमुख पाणलोट क्षेत्रापैकी १२ पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक जल पुनर्भरणच्या तुलनेत अधिक वेगाने पाणी उपसले जात आहे. पाणी उपसण्याच्या निकषावर गावनिहाय मूल्यमापन करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १९४८ गावे असून यातील ११७२ गावे सुरक्षित, तर ४१९ गावे धोक्याच्या पातळीच्या समीप आहेत. या गावांमध्येही वैयक्तिक लाभार्थींसाठी विहिरींना परवानगी नाही. केवळ दोन, तीनपेक्षा अधिक लोकांना सामाईक विहीर घेण्याची मुभा मिळेल.
ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली. जिल्ह्यात अशा गावांची संख्या ३५७ असून जी १५ पाणलोट क्षेत्रात येतात. यामध्ये गोदावरी खोऱ्यातील नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांचा समावेश होतो. या भागात सिंचन व अन्य कारणांस्तव उच्च शक्तीच्या वीज पंपांनी अमर्याद पाणी उपसा होत आहे. यातील निफाड हे अतिसिंचित क्षेत्र असून सिन्नरचा निम्मा भाग कोरडवाहू आहे. बेसुमार पाणी उपसा झालेल्या सिन्नरमधील ७७ गावांमध्ये विहिरींवर बंदी घालण्यात आली आहे.
बेसुमार उपशाचा अभ्यास
एखाद्या भागात किती पाऊस पडला, जलसंधारणाची कामे यातून किती पाणी जमिनीत झिरपते, याचा संगणकीय आज्ञावलीतून अनुमान काढला जातो. यामध्ये परिसरातील पिकांसाठी वापरलेले पाणीही विचारात घेतले जाते. या प्रक्रियेत ७० टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपसा झाला असल्यास ते गाव सुरक्षित मानले जाते. ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपसा होणारे भाग वेगवेगळ्या गटात समाविष्ट होतात. ९० ते १०० टक्के आणि १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपसा होणारा भाग धोकादायक व धोकादायक पातळीच्या समीप मानले जातात.