नाशिक : निरोप घेण्याच्या मार्गावर असलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमधील जलसाठा ५४ हजार ७९१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८३ टक्क्यांवर पोहचला आहे. गिरणा, तिसगाव धरणात निम्मा जलसाठा झाला आहे. नागासाक्या मात्र कोरडेच आहे. माणिकपूंजची स्थिती काहिशी तशीच आहे. नाशिक, नांदगाव, मनमाडसह अनेक भागात पाऊस झाला. जवळपास १४ धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पालखेड धरण तुडुंब झाल्यामुळे मनमाडकरांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबरच्या अखेरीस परतीच्या पावसाला सुरुवात होते. सध्या सुरू असलेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने अनेक भागात हजेरी लावली. तीन, चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. शहरात एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. नांदगावसह इतरत्र कमी-अधिक प्रमाणात तो कोसळला. त्यामुळे अनेक भागात चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटण्यास आणि विहिरींना पाणी उतरण्यासही तो सहाय्यभूत ठरेल. धरणसाठ्यात वाढ झाली. या पावसामुळे ग्रामीण भागात कांदा लागवडीची तयारीही सुरू झाली आहे.
हेही वाचा : नाशिक : ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान ; स्वच्छता ही सेवा अभियान
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही धरणे जवळपास तुडुंब झाली आहेत. या व्यतिरिक्त पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे जवळपास एकतर पूर्ण भरली आहेत वा भरण्याच्या स्थितीत आहेत.
हेही वाचा : शबरी योजनेतंर्गत घरकुलासाठी आंदोलन; नाशिकसह इगतपुरीत ठिय्या
मनमाडकरांना काहिसा दिलासा
मनमाड शहराला आवर्तनाद्वारे पाणीपुरवठा करणारे पालखेड धरण पूर्णपणे भरल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. किमान वर्षभर पालखेड आवर्तनाचे पाणी शहराला मिळण्याची खात्री यानिमित्ताने मिळाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे करंजवण धरण संपूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले असून पालखेड धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे. पालखेड डाव्या कालव्यात मनमाड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून हे पाणी आवर्तनाद्वारे मनमाड शहरासाठी सोडण्यात येते.
हेही वाचा : भाजप प्रवेशासाठी एकनाथ खडसे यांचा खटाटोप; गिरीश महाजन यांचा दावा
गिरणा, तिसगावमध्ये निम्माच जलसाठा
मुकणे धरण ९० टक्के भरले आहे. काही दिवस संततधार सुरू राहिल्यास ते तुडुंब भरू शकते. तिसगाव ५३ टक्के, गिरणा धरणात केवळ ५४ टक्के जलसाठा आहे. नागासाक्या धरणात यंदा एक टक्काही जलसाठा झाला नाही. माणिकपूंज धरणात केवळ नऊ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांची एकूण ६५ हजार २३० दशलक्ष घनफूट क्षमता आहे. सध्या त्यात ५४ हजार ७९१ (८३ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ९९ टक्के इतके होते. पावसाअभावी यंदा जायकवाडीसाठी विसर्गही कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.