नाशिक : स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावतीवर वारंवार चर्चा होत असताना मतदार यादीत देखील यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे उघड झाले आहे. प्रती हजार पुरुषांच्या मागे जिल्ह्यात स्त्री मतदारांचे प्रमाण ९१४ इतकेच आहे. महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक शाखा आता प्रत्येक गावात विशेष शिबिरांचे आयोजन करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी महिला-पुरुषांच्या जन्मदरात वाढणारी तफावत समोर येत असते. शहरी व ग्रामीण भागात ती अधिक रुंदावत असल्याचे दिसते. निवडणूक शाखेने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या एकूण ४६ लाख ५० हजार ६४० मतदार आहेत. यात २५ लाख २९ हजार ८०१ पुरुष तर २२ लाख २० हजार ७५८ स्त्री मतदार आहेत. म्हणजे मतदार यादीत (५२.२५ टक्के) पुरूष असून महिला मतदारांचे प्रमाण ४७.७५ टक्के आहे. प्रति हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९१४ इतके आहे. अपंग मतदारांमध्ये तशीच तफावत आहे. जिल्ह्यात एकूण १९ हजार ४६१ अपंग मतदार असून त्यात १२ हजार ९४ पुरुष तर सात हजार ३६७ स्त्री मतदार आहेत.

हेही वाचा : नाशिक: भूमाफियांच्या विळख्यातून शाळा वाचवा, रचनाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदार संघ असून प्रत्येक मतदार संघात स्त्री-पुरुष मतदारांमध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येते. यातही सर्वाधिक तफावत नाशिक पश्चिम, येवला, मालेगाव बाह्य, नांदगाव, सिन्नर या मतदारसंघात असल्याचे मतदार यादीतून स्पष्ट होते. महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे निवडणूक यंत्रणेने म्हटले आहे.

हेही वाचा : सेल्फी विथ मिट्टी अभियानामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची तारांबळ – छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्यासाठी धडपड

मतदारसंघनिहाय तफावत कशी ?

नाशिक पश्चिम हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असणारा मतदारसंघ. या ठिकाणी महिला-पुरुषामध्ये ३३ हजार ८४३ इतकी तफावत आहे. दर हजार पुरुषांमागे या मतदारसंघात केवळ ८५५ महिला मतदार आहेत. येवला मतदारसंघात हजार पुरुषांमागे ८९८, मालेगाव बाह्यमध्ये ८९९, सिन्नर ९००, नांदगाव, बागलाण व चांदवड प्रत्येकी ९०१, देवळाली ९१४, मालेगाव मध्य ९१६, नाशिक पूर्व ९३०, दिंडोरी ९३७, निफाड ९३९, इगतपुरी ९४२, नाशिक मध्य ९५५, कळवण ९५६ असे स्त्री मतदारांचे प्रमाण आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district 914 woman voters per 1000 men voters css
Show comments