मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणारे आणि सध्या मृतसाठा असलेले वाघदर्डी धरण नेहमीच चर्चेत असते. परंतु, सोमवारी मात्र ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले. या धरणावरील भिंतीवरून पहाटे अडीच वाजता बिबट्या आला आणि त्याने फिरताना डरकाळ्या फोडल्याची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. वन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन छाननी केली. शोध घेतला. परंतु, बिबट्याचा कुठलाही पुरावा आढळला नाही. कुणीतरी खोडसाळपणे चित्रफितीद्वारे अफवा पसरविल्याचे सिद्ध झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहाटेपासून शहरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांतील गटांवर २८ सेकंदाची एक चित्रफीत प्रसारित झाली. त्यात वाघदर्डी धरणाच्या भिंतीवरून जाताना चट्टेपट्टे असलेला बिबट्या डरकाळे फोडतांना दिसत होता. ही चित्रफीत प्रसारीत होताच नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. वन विभाग, नगरपालिका आणि पोलीस ठाण्यात अनेकांनी ही माहिती कळवून याबाबतची विचारणा सुरू केली. सोमवारी सकाळी ११ वाजता येवला येथील वनरक्षक सोनाली वाघ या वाघदर्डी धरणावर दाखल झाल्या. वाघदर्डी धरणावरील रोपवाटीकेचे वनसेवक इरफान सय्यद हेही होते. त्यांनी चित्रफितीची शहानिशा करण्यासाठी धरणाच्या भिंतीवरून फेरफटका मारला. तेथे कुठे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळतात का, याची तपासणी केली. आसपासचे ग्रामस्थ, नगपालिकेचे कर्मचारी यांच्याकडेही याबाबत विचारणा केली. आसपासच्या शेतकर्यांच्या शेळ्या, मेंढ्या व पशुधन यांचे काही नुकसान तर नाही ना, याची खात्री करून घेतली.

हेही वाचा : “संजय राऊत यांची नाशिकवारी म्हणजे राजकारण, दरोडेखोरी”, भाजपचा दावा

अखेर संपूर्ण तपासाअंती समाज माध्यमात प्रसारित झालेल्या चित्रफितीतील भिंत आणि प्रत्यक्ष धरणाची भिंत यात तफावत आढळली. तेथे कोठेही बिबट्याच्या खुणा व इतर कोणताही पुरावा आढळून आला नाही. कोणीतरी खोडसाळपणे ही चित्रफीत प्रसारीत केल्याचे आढळून आले. दोन वर्षांपूर्वीही शिवाजीनगर क्रमांक दोन भागात अशाच प्रकारे बिबट्या आला आणि तेथील शेळ्यांचा त्याने फडशा पाडल्याची अफवा पसरली होती. अखेर तेथे चरसाची पावले दिसली होती. तीही अफवाच ठरली. “नागरिकांनी खात्री केल्याशिवाय अशा प्रकारच्या संशयास्पद चित्रफीती समाज माध्यमांत प्रसारित करू नयेत”, असे आवाहन मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district at manmad rumors of leopards spread on social media css