नाशिक : जिल्ह्यात मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३० लाख नोंदींची तपासणी झाली असून यात ७२ हजार ८७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. संबंधित कुणबी नोंदींच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात येणार आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या धर्तीवर सरकारच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया जिल्ह्यात राबवली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला.
जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी सुरू आहे. दस्तावेज खोलीतील प्रत्येक सरकारी दस्तावेज तपासला जात आहे. अन्य सरकारी विभाग पडताळणी करत आहेत. या पथकांनी आतापर्यंत २९ लाखहून अधिक नोंदी तपासल्या आहेत. यात ७२ हजार ८७६ कुणबी नोंदी आढळल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
हेही वाचा : नाशिक : बंधाऱ्यात बुडाल्याने दोन मुलींचा मृत्यू
जिल्हास्तरीय कक्षाकडून आवश्यक त्या सूचना तालुकास्तरीय समित्यांना पाठविल्या जात आहेत. शासकीय दस्तावेज, आजवर दिली गेलेली वेगवेगळी प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू दाखले आदींमध्ये कुठे कुणबी म्हणून जातीची नोंदणी केलेली आहे, त्यांचा शोध सुरू आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी १९६७ पूर्वी जारी केलेल्या शालेय दाखल्यात कुणबी जातीचा उल्लेख असल्यास त्यांचे स्कॅनिंग करण्यास सांगण्यात आले आहे. कुणबी नोंदी आढळणाऱ्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ते दस्तावेज डिजिटल स्वरुपात जतन केले जातील. सरकारने नमूद केलेल्या संकेतस्थळावर ते समाविष्ट केले जाणार आहेत. शासकीय यंत्रणेकडे १८१८ पासून दस्तावेज आहेत. द्स्तावेज खोलीचे दस्तावेज डिजिटली स्कॅन केलेले असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक दस्तावेजाची काटेकोरपणे पडताळणी केली जात असल्याचे अधिकारी सांगतात.
हेही वाचा : नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा मोर्चा
सुट्टीत शिक्षकांकडून नोंदी तपासणी
शाळांमध्ये असणाऱ्या नमुना क्रमांक एकमधील प्रशासकीय नोंदी तपासणीचे आदेश शाळास्तरावर देण्यात आले होते. यात दिंडोरी तालुक्यात एकुण एक लाख ३९ हजार ८९६ नोंदी तपासण्या आल्या असून एकूण २४८३ इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी दिली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असतांना प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तत्काळ शाळेवर बोलावून शिक्षकांकडून नोंदी तपासणी करुन घेण्यात आल्या.
हेही वाचा : भेसळीच्या संशयातून मसाला, मिरची पावडर साठा जप्त
दिंडोरी तालुक्यातील शाळास्तरावरुन कुणबी नोंदी तपासण्यात आल्या. त्यात १९६७ पूर्वीच्या एकुण १६६ शाळांपैकी १५४ शाळांमध्ये १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण ८५ हजार ३९ इतक्या नोंदी तपासल्या गेल्या. त्यात एकूण १२ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. तसेच सन १९४८ पूर्वीच्या ५४ हजार ८५७ नोंदी तपासण्यात आल्या असून त्यात २४७१ इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत असे गवळी यांनी दिली.