नाशिक : महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४२३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कार्यशाळेत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषदेतील रावसाहेब थोरात सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. त्यात विविध तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरुपात ४१ शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून यापूर्वी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभव यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी कार्यशाळेत सर्व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणीबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. सर्व गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) यांनी वैयक्तिक लक्ष देवून रेशीम उद्योगाविषयी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कृषि विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) माधुरी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : नाशिक : नर्तनरंगतर्फे नृत्य महोत्सवाची तयारी, शुक्रवारी कथक तालांचे समग्र दर्शन
प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती. याआधी रेशीम शेतीचा प्रकल्प केवळ रेशीम विभागामार्फत राबविला जात असल्याने रेशीम शेती उद्योगास तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार रेशीम विभागास होते व प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना होते. मित्तल आणि डॉ. गुंडे यांच्या पाठपुराव्याने रेशीम शेतीबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानुसार तांत्रिक मंजुरीचे अधिकार कृषि अधिकारी व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार गटस्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
हेही वाचा : बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांना गावी परतण्यासाठी मोफत बससेवा, नाशिकहून साडेतीन हजार मोर्चेकरी रवाना
आतापर्यंत नव्या शासन निर्णयानुसार एकूण १८१ शेतकऱ्यांची निवड कृषी विभागाने केली आहे. संबंधितांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गट स्तरावर शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्यामध्ये आजतागायत १३२२ शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे. या योजनेत जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड ही ग्रामसभेतून करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी दिली.