नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरातील महिरावणी येथे मोठ्या प्रमाणात परदेशस्थ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यात आफ्रिकन देशातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून परदेशी विद्यार्थ्यांकडे अमली पदार्थ आहेत किंवा काय, याची तपासणी करण्यात येत आहे. काही दिवसांपासून परदेशी विद्यार्थ्यांकडून स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या विद्यार्थ्यांकडे काही अमली पदार्थ असावेत, अशी शंका देखील उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये रचना विद्यालयाच्या जागेवर भूमाफियांचा डोळा, पत्र्याचे शेड उभारून बळकावण्याचा प्रयत्न
या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक आणि दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी, अमलदारांनी महिरावणी परिसरात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या निवासस्थांनाची अचानक तपासणी केली. यात सुमारे ३५ विद्यार्थ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह्य वस्तू मिळून आल्या नाहीत. त्र्यंबक रोडवरील हॉटेल आणि लॉजमध्ये काही आक्षेपार्ह्य कृत्य होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने मागील आठवड्यापासून अशा हॉटेल आस्थापनांची कसून तपासणी करण्यात येत असून ती आणखी व्यापक करण्यात येत आहे.