नाशिक : पावसाळा अखेरच्या टप्प्यात पोहोचला असला तरी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाळा निरोप घेण्याच्या मार्गावर असताना ती कसर भरून निघण्याची शक्यता धूसर झाली आहे. या एकंदर स्थितीमुळे अनेक भागातील टंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. सद्यस्थितीत ९८ गावे आणि १४१ वाड्या अशा २३९ ठिकाणी एकूण ८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.
पावसाअभावी अनेक भागात खरीप पिके हातातून गेली. पावसात मोठा खंड पडला. परतीच्या पावसाला सुरुवात होत असताना लहान-मोठ्या धरणांमध्ये अद्याप १६ टक्क्यांची कमतरता आहे. गोदावरीसह अनेक नद्यांच्या पातळीत फारशी वाढ झाली नाही. या स्थितीमुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याचे संकेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या दैनंदिन अहवालावरून मिळत आहेत.
हेही वाचा : नाशिकमध्ये भ्रमणध्वनी स्फोट, तीन जण जखमी
सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ९०९ मिलीमीटर पाऊस होतो. यंदा आतापर्यंत केवळ ६०७ मिलीमीटर म्हणजे ६६.८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १३० टक्के होते. संपूर्ण जिल्ह्यात दिंडोरी या एकमेव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे (११८ टक्के) पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व तालुके अखेरपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेत राहिले.
हेही वाचा : नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा
मालेगाव तालुक्यात (६७.५), बागलाण (७२.४). कळवण (७२.४). नांदगाव (९६.७), सुरगाणा (६१.९), नाशिक (७८.७), दिंडोरी (११८.३), इगतपुरी (५३.१), पेठ (७३.३), निफाड (७४.५), सिन्नर (६२.१), येवला (९०.७), चांदवड (७१.८), त्र्यंबकेश्वर (७३.३) आणि देवळा तालुक्यात (७०.६) टक्के असे पावसाचे प्रमाण आहे. घाटमाथ्यावरील भागात अधूनमधून जोरदार पाऊस झाला होता. परंतु, तिथेही सरासरी गाठली गेली नसल्याचे दिसून येते. ही बाब टंचाईचे सावट अखेरपर्यंत दूर न होण्याचे कारण ठरली.
हेही वाचा : नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीत वाढ, पाच संशयित ताब्यात
सात तालुक्यात टँकरने पाणी
उन्हाळ्यापासून टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या सात तालुक्यांत पावसाचा हंगाम संपुष्टात येत असतानाही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. संपूर्ण पावसाळ्यात अनेक भागात टँकरने पाणी द्यावे लागले. आजही या तालुक्यात ८६ टँकरच्या १९५ फेऱ्यांमधून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्यास बसली. या तालुक्यातील ३४ गावे आणि १५ वाडी अशा एकूण ४९ ठिकाणी २२ टँकरने पाणी पुरविले जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्याचीही टंचाईतून सुटका नाही. या तालुक्यात १४ गावे व १९ वाडी अशा ३३ ठिकाणी १५ टँकर पाणी दिले जात आहे. चांदवड तालुक्यात (२० गावे व ३९ वाड्या) २१ टँकर, नांदगाव (१९ गावे व ५५ वाड्या) १८ टँकर, बागलाण (तीन गावे व चार वाड्या) तीन टँकर, देवळा (पाच गावे व तीन वाड्या) पाच आणि सिन्नर तालुक्यात (तीन गावे व सहा वाड्या) दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा : नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन; बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम
४१ विहिरींचे अधिग्रहण
गावात पाणी पुरवठा आणि टँकर भरण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ४१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यात गावांसाठी २४ तर टँकरसाठी १७ विहिरींचा समावेश आहे. बागलाण तालुक्यात चार, चांदवड एक, दिंडोरी चार, देवळा आठ, मालेगाव १५, नांदगाव आठ, येवला तालुक्यात एक विहीर अधिग्रहीत करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.