नाशिक : मनोज जरांगे यांनी गुरुवारी आमरण उपोषण मागे घेतल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने स्थगित करण्यात आलेली बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांपासून काही मार्गांवर बससेवा बंद राहिल्याने महामंडळाचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले.
मराठा आरक्षणविषयक आंदोलनास काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यानंतर परिवहन महामंडळाने अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवली होती. नाशिक विभागाच्या सर्व आगारातून लासलगाव, छत्रपती संभाजी नगर, येवला यासह वेगवेगळ्या ठिकाणी जाणारी बस सेवा स्थगित ठेवण्यात आली होती.
हेही वाचा : दिवाळीमुळे वाहतूक मार्गात बदल
लासलगांव येथे बसची तोडफोड झाली होती. जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून बससेवा नेहमीच्या मार्गावर सुरू झाल्या. पहाटे प्रवाशांची संख्या कमी होती. परंतु, त्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होत गेली. याविषयी विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी माहिती दिली. पोलिसांनी बससेवा सुरू करण्याचा सल्ला दिल्यानंतर बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. जसा दिवस सरत गेला, त्याप्रमाणे प्रवाशांची संख्या वाढत गेली. सर्वच मार्गांवर बससेवा नियमित सुरू करण्यात आली आहे. बससेवा बंद राहिल्याने २० लाखांहून अधिकचा महसूल बुडाल्याचे सिया यांनी सांगितले.