नाशिक: कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता दुकानातील व्यावसायिक वीज मीटर काढून तिथे औद्योगिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या पिंपळगाव उपविभागातील उपकार्यकारी अभियंता किसन कोपनरला (४४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कोपनर विरुध्द पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसोबत येवला तालुक्यात गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धसला २० हजारांची लाच घेताना तर येवला उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन रहाटळला ७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदाराला आपल्या दुकानातील व्यावसायिक वीज मीटर बदलून औद्योगिक मीटर बसवायचे होते. कोणतेही कायदेशीर प्रक्रिया न राबविता हे काम करून देण्याची तयारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव उपविभागातील उपकार्यकारी अभियंता किसन कोपनरने दर्शविली. या मोबदल्यात कोपनरने एक लाख रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कोपरनला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून निरीक्षक संदीप घुगे यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस नाईक गणेश निंबाळकर, शिपाई नितीन नेटारे यांचा समावेश होता.

हेही वाचा : कसारा स्थानकालगत पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंक तुटले, दुरुस्तीनंतर ४० मिनिटांनी रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ

येवल्यात लाचखोर गटविकास अधिकारी, कारकुनला पकडले

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या विकास कामांचे देयक मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धसला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून दिला जातो. त्या अंतर्गत तक्रारदाराने २०२२-२३ वर्षात ग्रामपंचायत हद्दीतील वस्तीवर विकास कामे केली होती. या कामांचे देयक मंजूर करण्यासाठी धनादेशावर स्वाक्षरी घेण्यासाठी येवला तालुक्यातील गटविकास अधिकारी (वर्ग एक) मच्छिंद्रनाथ धस यांनी देयकाच्या दोन टक्के याप्रमाणे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धसला रंगेहात पकडले. त्याच्याविरुध्द येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच तालुक्यात दुसरी कारवाई करण्यात आली. भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी ७०० रुपयांची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन रहाटळला पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या नातेवाईकांनी येवला उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा दाखला देण्याच्या मोबदल्यात अव्वल कारकुन जनार्दन रहाटळने ११०० रुपयांची मागणी केली होती. पहिल्या भेटीवेळी १०० रुपये स्वीकारले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या पडताळणी कारवाईदरम्यान संशयित रहाटळने तडजोडीअंती ७०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करीत ही रक्कम येवला उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्विकारली. त्याच्याविरुध्द येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district three government officers caught red handed while accepting bribe in 3 different cases css
Show comments