नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘हर घर जल’सह विविध शासकीय योजनांचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे १० तालुक्यांतील ७८३ गावे व वाड्यातील सुमारे पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. गावांची तहान भागविणे आणि टँँकर भरण्यासाठी १३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. २५६ टँकर दैनंदिन ५६२ फेऱ्यांमधून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिलच्या मध्यावर तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. उष्णतेच्या लाटेत पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करीत आहे. नाशिक, दिंडोरीसह धुळे लोकसभा मतदार संघात प्रचाराने वेग घेतला आहे. तळपत्या उन्हात प्रत्यक्षात टंचाईचे बसणारे चटके आणि प्रचारात रंगवले जाणारे चित्र यातील विसंगती ठळकपणे दिसत आहे. मागील दोन आठवड्यात टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या लक्षणीय विस्तारली. जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार सध्या २४८ गावे आणि ५३५ वाड्या अशा एकूण ७८३ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील एका गावासही टँकरने पाणी देण्याची वेळ आली असताना आजवर टंचाईपासून दूर राहिलेल्या कळवणमध्येही टँकर सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १० तालुक्यांत पाणी टंचाईची झळ बसत असून चार लाख ९७ हजार ६६६ नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.

हेही वाचा : उमेदवारीचा ताण दूर झाल्याने आयपीएल सामने पाहण्यात भुजबळ रममाण…

प्रशासनाच्या अहवालानुसार नांदगाव तालुक्यात ५८ गावे व २५५ अशा एकूण ३१३ गाव-वाड्यांना ६४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मालेगाव तालुक्यात १०७ गाव-वाडे (३६ टँकर), येवला तालुक्यात ७७ (४५ टँकर), बागलाण ३५ (३२), चांदवड ९३ (३०), देवळा ६१ (३०), इगतपुरी एक (एक), सुरगाणा पाच (दोन), सिन्नर ७६ (१७) असे टँकर सुरू आहेत.

जिल्ह्यात २५६ टँकरमार्फत दैनंदिन ५६२ फेऱ्या मारल्या जात आहेत. प्रशासनाने बागलाण तालुक्यात ३७, चांदवडमध्ये पाच, देवळा ३०, मालेगाव ३१, कळवण १५, नांदगाव चार आणि येवला तालुक्यात सहा विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी आणि पेठ या सहा तालुक्यात अद्याप टँकरने पाणी देण्याची वेळ आलेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी प्रशासनाला खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे क्रमप्राप्त ठरले. गावांसाठी २७ तर, टँकरसाठी १०३ अशा एकूण १३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दिंडोरी, नाशिक, निफाड, पेठ व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यात टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. परंतु, अनेक भागात पाण्यासाठी स्थानिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे.

हेही वाचा : नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत

तालुकानिहाय स्थिती

जिल्ह्यात १० तालुक्यांतील ७८३ गावे आणि पाड्यावरील सुमारे पाच लाख नागरिकांची टँकरच्या पाण्यावर भिस्त आहे. यात नांदगाव तालुक्यातील एक लाख २६ हजार ६८८, येवला (७७४०७), बागलाण (५९११२), चांदवड (६६६०२), देवळा (२५७८०), इगतपुरी (९१०), कळवण (९४५३९), सुरगाणा (१३३५) आणि सिन्नर तालुक्यातील (२७७६३) लोकसंख्या टँकरवर अवलंबून असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district water crisis water supplied through tankers to around 5 lakh peoples of 783 villages css
Show comments