नाशिक : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या घाटमाथ्यांवरील तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या भागातील धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. यामुळे गुरुवारी दारणा, कडवा आणि नांदुरमध्यमेश्वरच्या विसर्गात आणखी वाढ करावी लागली. आंबोलीला ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५३ टक्के जलसाठा झाला आहे. सायंकाळी पावसाने उघडीप घेतल्याने विसर्गाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय सुरू झाला.

मागील पाच दिवसांपासून सुरू असणारी संततधार गुरुवारीही अनेक भागात कायम राहिली. प्रारंभीचे दीड महिने पावसाने इतरत्र हजेरी लावली. मात्र घाटमाथा भागात फारसा पाऊस नव्हता. ही कसर सध्या भरून निघत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही आंबोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. मागील २४ तासात या ठिकाणी ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात १०१, सुरगाणा तालुक्यात (७०), इगतपुरी (६७), पेठ (७८) मिलिमीटरची नोंद झाली. दिंडोरीत (४६), नाशिक (२२), बागलाण (१५), निफाड (१९), कळवण (१७) मिलिमीटर पाऊस झाला. इतर भागात तो तुरळक स्वरुपात आहे.

हेही वाचा : नाशिक: कारागृहातून सुटलेल्या गुंडाची मिरवणूक, दहशतीने रहिवाशांना धास्ती

चार ते पाच तालुक्यात पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. भावली धरण आदल्या दिवशी तुडुंब भरून ओसंडत होते. दारणा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी ११९४६ क्युसेकपर्यंत वाढविला गेला. कडवा धरणातही पाणी पातळी वाढल्याने दुपारपासून सुरू केलेला विसर्ग ८०० क्युसेकवर नेण्यात आला. नांदुरमध्यमेश्वरमधून सायंकाळी ११७९ क्युसेकने पाणी मराठवा्ड्यातील जायकवाडीसाठी सोडण्यात आले. या हंगामात एक जून ते आतापर्यंत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३६० दशलक्ष घनफूटचा विसर्ग झाला आहे. सायंकाळी पावसाने काहिशी उघडीप घेतली. त्यामुळे दारणातील विसर्ग कमी केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पावसामुळे नाशिक-पुणे बस सेवा विस्कळीत

धरणसाठ्यात चार टक्के वाढ

चार ते पाच दिवसांतील पावसाने काही भागातील धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. एका दिवसात जिल्ह्यातील धरणसाठ्यात चार टक्के वाढ होऊन एकूण जलसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्र्यंबकेश्वर, आंबोली भागातील मुसळधार पावसाने नशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण निम्म्याहून अधिक भरले आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपीत २३ टक्के, गौतमी गोदावरी (४९ टक्के), आळंदी (११ टक्के) असा जलसाठा झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओसंडून वहात आहे. दारणा धरणात ७१ टक्के, मुकणे (२७ टक्के), वालदेवी (४६), कडवा (८१) टक्के, भोजापूर (एक) जलसाठा आहे. पालखेड धरणात २४ टक्के, करंजवण (पाच), वाघाड (२२) असा जलसाठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर (१४ टक्के), हरणबारी (१९), केळझर (आठ), गिरणा (११), पुनद (४०) टक्के जलसाठा आहे. माणिकपूंज, नागासाक्या, पुणेगाव, तिसगाव व ओझरखेड ही धरणे अजूनही कोरडी आहेत.