लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. या भागात संघटित गुन्हेगारी वाढत आहे. चौकाचौकात टोळके बसतात. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे केले जातात. धिंगाणा घालतात. महिला, मुलींची छेडछाड केली जाते, अशा तक्रारी भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था सुरळीत होत असताना सातपूर, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र विपरित स्थिती आहे. टवाळखोरांच्या कार्यशैलीने नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलीस गस्तही घालत नाहीत. कुणी नागरीक तक्रार द्यायला गेले तर त्यांना जास्त वेळ बसवून ठेवले जाते. त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न होतात.
हेही वाचा… महागाईवर नियंत्रणासाठी केंद्राचे प्रयत्न: कैलास विजयवर्गीय यांचे आश्वासन
नागरीकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. श्रमिकनगर भागात काही गुंडांनी अभिजित इंगळे या युवकाला बेदम मारहाण केली. त्या गुंडांवर कारवाई केली गेली नाही. श्रमिकनगर भागात हे गुंड दहशत माजवतात. शिवाजीनगर भागातही अशा काही गुंडांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरही कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठलाही धाक उरलेला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा… तापी बुऱ्हाई सिंचन योजना २५ वर्षांपासून पूर्णतेच्या प्रतिक्षेत – जलसंपदाचे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष
सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत. यासाठी काही राजकीय लोक जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. गैरकृत्यांना पाठिशी घालणाऱ्या राजकीय लोकांवरही कारवाई करावी. रोलेटसारख्या ऑनलाईन गेमच्या व्यसनाला युवक बळी पडत आहेत. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढत आहे. गुन्हेगारी वाढत आहे. रोलेटसारखे गेम चालविणाऱ्यांवर कारवाई करावी आणि कार्बन नाका येथील बंद पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.